हैदराबाद : पुढच्या महिन्यात तेलंगणातील विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणुक होणार आहेत. त्यासाठी तेलंगणामधील गोशमहाल या मतदार संघातून राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी उमेदवार निवडणुकीसाठी उभी राहिली आहे. परंतु ही उमेदवार कालपासून बेपत्ता झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. चंद्रमुखी मुव्वाला असे बेपत्ता तृतीयपंथीचे नाव असून ती बहुजन डावी आघाडी या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभी राहिली होती.


तेलंगणा हिजडा समितीने याबाबत प्रसिद्धिपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये चंद्रमुखी बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात चंद्रमुखीचे अपहरण झाले असल्याची तक्रार दाखल केली आहे.

तेलंगणा हिजडा समितीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, चंद्रमुखीच्या तृतीयपंथी मैत्रिणी निवडणुकीच्या प्रचाराच्या कामांबाबत बोलण्यासाठी तिच्या घरी गेल्या होत्या. परंतु दिवसभरात चंद्रमुखी त्यांना कुठेच भेटली नाही. त्यामुळे समितीने चंद्रमुखीचे अपहरण झाल्याची शंका व्यक्त केली.

चंद्रमुखी ज्या गोशमहाल या मतदार संघातून निवडणुकीसाठी उभी राहिली आहे, तिच्याविरोधात काँग्रेसचे माजी मंत्री मुकेश गौड उभे आहेत. भाजपाचे टी. राजा आणि टीआरएसचे प्रेम सिंह राठोड याच मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलीसांनी चंद्रमुखीचा तपास सुरु केला आहे.