नांदेड : देशाच्या स्वातंत्र्यानंतर 16 वर्षे भाजपची (BJP) आणि उर्वरित काळात काँग्रेसची (Congress) सत्ता होती. दोन्ही पक्षांनी देशासाठी काय केलं? देशातील या परिस्थितीला भाजप आणि काँग्रेस जबाबदार आहेत. सरकार फक्त भाषणबाजीत वेळ घालवत आहे. कोणाला अंबानी तर कोणाला अदानी पाहिजे. मेक इन इंडिया जोक इन इंडिया झाला आहे, अशी टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( K Chandrasekhar Rao ) यांनी भाजप आणि काँग्रेसवर केली आहे. नांदेडमधील जाहीर सभेत ते बोलत होते.
"दिवाळीचे दिवे, तिरंगा, लायटिंग, रंग हे सर्व चीनमधून येत आहे. हे सर्व भारतात कसे येत आहे? भारतात चायना बाजार कसा लागतो? भारत बाजार का लागत नाही? असा प्रश्न उपस्थित करत के. चंद्रशेखर राव यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय. "देशात सध्या फक्त मन की बात, इसकी बात, उसकी बात यावरच भाषण सुरू आहे. त्यामुळेच देशातील बदलाची आवश्यकता लक्षात घेऊन BRS पार्टीचे विस्तारीकरण करत आहोत. देशातील विचारधारा बदलण्याची गरज आहे. देशातील जनतेने अनेक आमदार, मंत्री बनवले. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी देखील अनेक भागात आज देखील वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाहीत. हे पाहून फार दुःख होतंय, अशा भावना के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केल्या.
"शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. शेतकरी उगाच आत्महत्या करत नाही. देशाला धान्य, जीवनदान देणारा शेतकरी आत्महत्या करत आहे हे सर्व दुःखद आहे. देशातील शेतकऱ्यांच्या शेतात धान्य उगवण्याच्या जागी मृत शेतकऱ्यांचे मृतदेह उगवत आहेत. महाराष्ट्र अनेक नद्या आहेत तरी देखील मराठवाड्यात पाणी नाही. देशातील कृषियोग्य भूमी 41 कोटी एकर आहे. या सर्व शेतात पाणी जायला हवं. समुद्रात जाणारं पाणी शेतात यायला पाहिजे. परंतु, सरकार यावर काहीच काम करत नाही. त्यामुळं या सरकारवर आपण विश्वास करू शकत नाही, असा टोला के. चंद्रशेखरराव यांनी यावेळी लगावला.
के. चंद्रशेखर राव म्हणाले, " विविध रंगांचे झेंडे आणि धर्मावर जनतेला वेगळे केले जात आहे. देशात 16 करोड शेतकरी आहेत. शेतकरी आणि कामगार मिळून या देशातील सत्ता सहज मिळू शकते. दिव्याला दिवा लावून आपण पुढे जाऊ. भारत बुद्धिजीवी देश आहे, बुद्धुंचा देश नाही. आता ही सत्ता हटवण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांना आता लेखणी घेऊन कायदा बनवण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच अबकी बार किसान सरकार हा नारा आम्ही दिलाय. देशात कोणताही पक्ष जिंकतो पण जनता हारते. भारत हा गरीब देश नाही.
आपला देश अमेरिकेपेक्षा श्रीमंत आहे. भारतात संपत्ती आहे, पण त्यापासून जनता वंचित आहे. या देशात पाणी, कोळसा, जमीन असं सगळं आहे. अमेरिका, चीन हे आपल्या देशापेक्षा मोठे आहेत पण त्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन फार कमी आहे. हे सर्व आकडे माझे नाहीत तर हे सरकारचे आकडे आहेत. पावसाळ्यात देशात 1 लाख हजार TMC पाऊस होतो, पण त्याचा योग्य वापर होत नाही. जवळपास 50 हजार TMC पाणी सरळ समुद्रात जाते. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे."