हैदराबाद/पुणे : अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांकडून पैशांची मागणी होणं ही सर्वसामान्य बाब आहे. परंतु हैदराबादमध्ये अपहरणकर्त्यांने अपहृत मुलाच्या कुटुंबाकडून चक्क आपल्या प्रेयसीची मागणी केली. मात्र पोलिसांनी अपहरणकर्त्याचा कट हाणून पाडला आणि सोमवारी सकाळी (9 एप्रिल) पुणे स्टेशनवरुन अपहृताची सुटका केली.


तेलंगणाच्या वानपर्ती जिल्ह्याच्या कोथाकोटामधून एका आठ वर्षीय मुलाचं अपहरण झालं होतं. परंतु तेलंगणा पोलिसांनी 24 तासातच मुलाची सुखरुप सुटका केली.

काय आहे प्रकरण?
महबूबनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय वामसी कृष्णने कोथाकोटामधील भारतीय विद्या मंदिर स्कूलमध्ये तिसरीत शिकणाऱ्या रतलावत चंद्रू नायक या मुलाचं अपहरण केलं होतं.

आरोपीचे मुलाच्या आत्यासोबत प्रेमसंबंध होते. ती हैदराबादच्या शिवरामपल्ली परिसरात राहते. त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत तिच्या कुटुंबीयांना समजलं होतं. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी वामसी कृष्णला मारहाण केली होती. तसंच इथे कधीही दिसायचं नाही, अशी धमकीही दिली होती.

या प्रकारामुळे वामसी कृष्णच्या मनात अपमानित झाल्याची भावना होती. त्यामुळे वामसीने याचा बदला घेण्याचं ठरवलं. त्याने 7 एप्रिल रोजी शाळेत जाऊन व्यवस्थापना चंद्रूच्या आईचा अपघात झाल्याचं सांगितलं आणि त्याला आपल्यासोबत पाठवण्याची विनंती केली.

वामसी कृष्ण आपला शेजारी असल्याचं मुलाने आणि त्याच्या दोन भावांनी व्यवस्थापनाला सांगितलं. त्यानंतर स्टाफनेही मुलाला वामसीसोबत सोडण्याची तयारी दर्शवली.

पुणे रेल्वे स्टेशनवर आरोपीला बेड्या
मुलाच्या दोन्ही भावांना कोथाकोटा बस स्टॅण्डवर वाट पाहण्याचं सांगून वामसी चंद्रूला सोबत घेऊन केला. यानंतर वामसीने चंद्रूच्या घरात फोन करुन तो आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला. वामसी कृष्णने मुलाच्या मोबदल्यात प्रेयसीची मागणी केली. वामसीच्या फोन कॉलनंतर  मुलाच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

वानपर्ती जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षक रेमा राजेश्वरी यांनी तातडीने विशेष पथकाची स्थापना केली. पोलिसांनी अपहरणकर्त्याचा महाराष्ट्रापर्यंत पाठलाग केला. आरोपी ट्रेनने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर तेलंगणा पोलिसांनी तातडीने सोलापूर पोलिस आणि आरपीएफ हेर यांना अलर्ट केलं. या पथकाचं नेतृत्त्व करणारे कोथाकोटाचे सोमानारायण सिंह हे देखील पुण्याला रवाना झाले होते.

पुणे रेल्वे स्टेशनवर ट्रेनमधून उतरुन मुलासोबत पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी आरोपी वामसी कृष्णच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करुन मुलाची सुटका केली.