16 वर्षांची अमिषा आणि 14 वर्षांची रेशू शालेय जीवनापासून जीवलग मैत्रिणी होत्या. दोघी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये कैलासनगर भागात राहायच्या. अमिषाचे वडील अशोक पांडे प्रॉपर्टी डीलरचं काम करतात, तर तिची आई मंजू गृहिणी आहे. रेशूचे वडील अभय द्विवेदी वायूसेनेतून निवृत्त झाले आहेत.
अमिषाने नुकतीच बारावीची, तर रेशूने दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत चांगले गुण मिळाल्यास स्कूटी देण्याचं आश्वासन दोघींच्या पालकांनी दिलं होतं. त्यामुळे दोघींनीही स्कूटी शिकायला सुरुवात केली होती.
दोघी रविवारी गल्लीतच स्कूटी चालवत होत्या. त्यानंतर अमिषा स्कूटी घेऊन हरजेंद्रनगर फ्लायओव्हरवर पोहचली, तर रेशू मागे बसली होती. अचानक अमिषाचं स्कूटरवरुन नियंत्रण सुटलं आणि त्या डिव्हायडरवर आपटल्या.
दोघींना जखमी अवस्थेत काशिराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांनी हेल्मेट घातलं असतं, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, अशा भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.