Agneepath Air Force Scheme : भारतातील सैन्य भरतीसाठी असलेल्या अग्निपथ योजनेला विरोध सुरू असताना दुसरीकडे हवाई दलातील भरतीला युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अग्निपथ योजनेतंर्गत भरतीसाठी दोन दिवसांत 56,960 जणांनी अर्ज केले आहेत. हा आकडा रविवारपर्यंतचा आहे. या योजनेनुसार, हवाई दलातील भरतीसाठीची नोंदणी शुक्रवारपासून सुरू झाली. 


हवाई दलाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, अग्निपथ योजनेनुसार, भरतीसाठीच्या अर्ज प्रक्रियेसाठी 56960 जणांनी अर्ज केले आहेत. नोंदणी प्रक्रिया 5 जुलै रोजी बंद होणार आहे. हवाई दलात अग्निपथ योजनेतंर्गत भरतीसाठी 24 जून 2022 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. हवाई दलातील चार वर्षांच्या सेवेसाठी इच्छुक असलेल्या युवकांना careerindianairforce.cdac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येतील. 


अग्निवीर चार वर्षांसाठी भरती केली जाईल


अधिकृत अधिसूचनेनुसार, अग्निपथ योजनेअंतर्गत हवाई दलाच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 5 जुलै 2022 रोजी संपणार आहे. 'अग्निवीर' भरतीसाठी उमेदवारांनी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने 14 जून रोजी अग्निपथ योजना जाहीर केली होती. या योजनेत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी भरती केले जाईल. यापैकी 25 टक्के अग्निवीरांना  नियमित सेवेत दाखल केले जाणार आहे.


अग्निपथ योजनेविरोधात आंदोलने


अग्निपथ योजनेविरोधात देशभरात युवकांनी हिंसक आंदोलने केली होती. अग्निपथ योजना म्हणजे सैन्याचे कंत्राटीकरण असल्याचा आरोप करण्यात आला होता. चार वर्षाच्या सेवेनंतर युवकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल असा आक्षेप युवकांनी घेतला होता. त्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय निमलष्करी दलासह शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची घोषणा केली. त्याशिवाय, काही खासगी उद्योजकांनीदेखील अग्निवीरांना नोकरीत प्राधान्य देण्याची घोषणा केली.