विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशमधील तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) दोन नेत्यांची माओवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अराकू मतदारसंघाचे विद्यमान आमदार किदारी सर्वेस्वरा राव आणि माजी आमदार सीवेरी सोमा यांच्यावर डुब्रीगुडा मंडल या भागात गोळीबार करण्यात आला, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या गोळीबारात 20 पेक्षा जास्त माओवाद्यांचा सहभाग होता, असं बोललं जात आहे. या गोळीबारामध्ये राव यांच्या पीएचाही मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

राव हे वायएसआर काँग्रेसमधून टीडीपीमध्ये सहभागी झाले होते. चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची त्यांना प्रतिक्षा होती. मात्र त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.

''पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. हे माओवादी गावकऱ्यांसोबत आले होते. आणखी काही माओवादी लपले असल्याची शक्यता आहे. दुपारी 12 वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षकांकडून शस्त्र हिसकावून घेतले आणि गोळीबार करण्यात आला. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. गोळीबार करण्यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही,'' अशी माहिती विशाखापट्टणमचे उप पोलीस महानिरीक्षक श्रीकांत यांनी दिली.


दरम्यान, चंद्राबाबू नायडू सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. अधिकाऱ्यांनी चंद्राबाबूंना या घटनेबाबत माहिती दिली.