चेन्नई: टाटा समूहाकडून (Tata Group) तामिळनाडूतील त्यांच्या इलेक्ट्रॉनिक प्लॅन्टमध्ये बंपर भरती करण्याचं नियोजन सुरू आहे. टाटा समूहाच्या आयफोन (iPhone) चे पार्ट्स तयार करण्यात येणाऱ्या होसुरमधील प्लॅन्टमध्ये 45,000 महिला कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याची माहिती आहे. ब्लुमबर्गने दिलेल्या एका वृत्तानुसार, अॅपल या कंपनीसोबतच्या व्यापारात मोठी वाढ करण्यासाठी टाटा ग्रुपपकडून हे पाऊल उचललं जाणार आहे. 


येत्या दीड ते दोन वर्षामध्ये 45,000 महिला कर्मचाऱ्यांची ही भरती पूर्ण करण्याचं लक्ष्य टाटा समूहाचं असल्याची माहिती आहे. तामिळनाडूतील होसुर या ठिकाणच्या इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये आयफोनसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स तयार केले जातात. सध्या या कंपनीकडून अॅपल आयफोनसाठी आवश्यक पार्ट्स तयार करण्यात येत असून या व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा मानस टाटा समूहाचा आहे. 


तामिळनाडूतील होसुर या टाटा समूहाच्या प्लॅन्टमध्ये सध्या 10,000 कर्मचारी काम करत आहेत. त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. 


अॅपल या कंपनीने आता चीन व्यतिरिक्त इतर देशांमध्येही आयफोनच्या म्यॅन्यूफॅक्चरिंग विकसित करण्यावर भर दिला आहे. अॅपलसाठी चीनला पर्याय ठरणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा समूहाच्या कंपनीचा समावेश आहे. टाटा कंपनीच्या या निर्णयामुळे भारतातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळणार आहे. 


तामिळनाडूतील या कंपनीमध्ये सप्टेंबर महिन्यात 5,000 महिला कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना 16,000 रुपयांचं मासिक वेतन देण्यात आलं आहे. भारतात या प्रकारचं काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे वेतन 40 टक्क्यांहून अधिक आहे. तसेच या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना मोफत जेवनाची सुविधा दिली जाते. या कर्मचाऱ्यांना टाटा समूहाकडून मोफत प्रशिक्षणही देण्यात येतं. 


चीनमधून अॅपलचा काढता पाय? 


अॅपलचे सर्वात मोठं मॅन्युफॅक्चरिंगचं काम हे सध्या चीनमधून केलं जातंय. पण चीन सरकारची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलती भूमिका आणि इतर काही कारणांमुळे अॅपलकडून म्यॅन्युफॅक्चरिंगसाठी इतर पर्यायांची चाचपणी सुरू आहे. अॅपलने पूर्वीच्या कामाच्या तुलनेत सध्या चीनमधून आपलं उत्पादन कमी केलं आहे. इतर देशांमध्ये त्यांचे म्यॅन्युफॅक्चरिंगचं काम केलं जात आहे. भारत हा त्यासाठी एक पर्याय असून या देशामध्ये भविष्यात अॅपलचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जाऊ शकतं.