मुंबई : रतन टाटा यांचे एअर इंडियाची मालकी पुन्हा मिळवण्याची स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. जेआरडी टाटा यांनी 1932 साली एअर इंडियाची स्थापना केली. आता  आर्थिक संकटात असलेल्या सरकारी कंपनी एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा सन्सनं बोली लावली आहे. टाटा सन्सच्या प्रवक्त्यांनी एबीपी न्यूजला आर्थिक बोलीची अधिक माहिती न देता पुष्टी केली.


एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी अनेक प्रस्ताव मिळाले आहेत. त्याचबरोबर टाटा सन्सचा प्रस्ताव देखील मिळाला आहे, असं ट्वीट डीआयपीएएम सचिव तुहिन कांत पांडे यांनी केलं आहे.






केंद्र सरकार सरकारी मालकीच्या विमान कंपनीतील आपला 100 टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. ज्यात एआय एक्स्प्रेस लिमिटेडचा 100 टक्के हिस्सा आणि एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा 50 टक्के हिस्सा आहे. निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जानेवारी 2020 पासून सुरू झाली होती, जी कोरोना महामारीमुळे लांबली आहे. त्यानंतर सरकारने संभाव्य बोलीदारांना एप्रिल 2021 मध्ये आर्थिक बोली सादर करण्यास सांगितले होते.


भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि कमी किमतीच्या विमान वाहतुकीसाठी एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण केल्याच्या 63 वर्षांनंतर रतन टाटा एअर इंडियाला परत आपल्याकडे आणण्यास उत्सुक होते. सूत्रांच्या माहितीनुसार, जर बोली योग्य पद्धतीने लागली तर एअर इंडिया डिसेंबरपर्यंत नवीन मालकाकडे सोपवली जाऊ शकते. एअर इंडियासाठी आतापर्यंत फक्त दोनच बोली प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांनी एअर इंडियासाठी बोली लावली आहे.


एअर इंडियावर 43 हजार कोटींचं कर्ज


विशेष म्हणजे एअर इंडियावर सुमारे 43 हजार कोटींचे कर्ज आहे. यापैकी 22 हजार कोटी एअर इंडिया अॅसेट होल्डिंग लिमिटेडला हस्तांतरित केले जातील. वर्ष 2018 मध्ये सरकारने एअर इंडियामधील 76 टक्के हिस्सा विकण्याचा विचार केला होता, परंतु त्यावेळी कोणतीही खरेदी झाली नाही. त्यानंतर ते पूर्णपणे विकण्याची प्रक्रिया सुरू झाली.