Security Meeting On J&K : काश्मिरी पंडित आणि इतर नागरिकांवर होत असणाऱ्या हल्ल्यांबाबत आज मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. टार्गेटेड किलिंगमुळे बिघडणारी परिस्थिती सांभाळण्यासाठी आता गृहमंत्री अमित शाह यांनी पुढाकार घेतला आहे. दहशतवादी हल्ला आणि खोऱ्यातील सुरक्षेबाबत अमित शाह यांनी बैठक बोलावली आहे. दिल्लीमध्ये आज होणाऱ्या बैठकीत जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रशासित प्रदेशाचे अधिकारी सहभागी होतील. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबत मागील 15 दिवसांमधली ही दुसरी बैठक आहे. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला डोवालही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
टार्गेटेड किलिंगवर मोठ्या निर्णयाची शक्यता
या बैठकीत जून महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेपासून ते खोऱ्यातील सर्वसामान्यांच्या हत्यांबाबत चर्चा होणार आहे. गेल्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादविरोधी कारवायांवर विशेष भर दिला होता. गेल्या 22 दिवसांत 8 टार्गेट किलिंग करुन दहशतवाद्यांनी खोऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण केलं आहे. टार्गेटेड किलिंगबाबत गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.
काल (2 जून) काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी एका हिंदू बँक कर्मचाऱ्याची हत्या केल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक बैठक बोलावली, ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्यासह उच्च अधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीवर चर्चा झाली जिथे मे महिन्यापासून टार्गेटेड किलिंगच्या घटना समोर आल्या आहेत.
अमित शहा यांची डोवाल आणि RAW प्रमुखांसोबत चर्चा
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर शाह यांनी आज बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीच्या एक दिवस आधी ही चर्चा झाली. डोवाल आणि गुप्तचर संस्था रॉ (रिसर्च अँड अॅनालिसिस विंग) प्रमुख सामंत गोयल यांनी अमित शाह यांच्याशी त्यांच्या नॉर्थ ब्लॉक कार्यालयात दुपारी सुमारे एक तास चर्चा केली.
काश्मीरमध्ये मे महिन्यात टार्गेटेड किलिंगच्या आठ घटना
1 मे पासून काश्मीर खोऱ्यात टार्गेटेड किलिंगच्या आठ घटना घडल्या आहेत. जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यातील एका शिक्षकाची मंगळवारी काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली. त्याच वेळी, 18 मे रोजी, दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला इथे एका दारुच्या दुकानात घुसून ग्रेनेड फेकलं, ज्यात जम्मूच्या रहिवाशाचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले.
काश्मीर खोऱ्यात, पोलीस कर्मचारी सैफुल्लाह कादरी यांची 24 मे रोजी श्रीनगरमधील त्यांच्या निवासस्थानासमोर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तर टीव्ही अभिनेता अमरीन भट याची दोन दिवसांनी बडगाममध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली होती. 2012 मध्ये पंतप्रधान पॅकेज अंतर्गत काम करणारे काश्मिरी पंडित सतत निदर्शने करत आहेत आणि राहुल भटच्या हत्येनंतर पळून जाण्याची धमकी देत आहेत. मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील कार्यालयात घुसून राहुल भट यांची 12 मे रोजी दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
सुरक्षेअभावी अनेकांनी काश्मीर खोरे सोडलं
सुरक्षेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या काश्मिरी पंडित समुदाय आणि टार्गेटेड किलिंगनंतर काही लोक काश्मीर खोरे सोडून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "यंदा अमरनाथ यात्रेच्या दोन्ही मार्गांवर जम्मू आणि काश्मीर पोलिस कर्मचार्यांव्यतिरिक्त 12,000 अतिरिक्त निमलष्करी जवान तैनात केले जाण्याची अपेक्षा आहे." अमरनाथ यात्रेचा एक मार्ग पहलगाम मार्गे तर दुसरा मार्ग बालताल मार्गे जातो. भाविकांच्या सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. यंदा अमरनाथ यात्रा 11 ऑगस्टला संपणार असून तीन लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.