तामिळनाडू विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. राज्याचे अर्थमंत्री पीटीआर पलानीवेल त्यागराजन (PTR Palanivel Thiagarajan) यांनी राज्याच्या इतिहासातील पहिला ई-बजेट सादर केला. तामिळनाडू सरकारने पेट्रोल कर तीन रुपये प्रति लीटर कमी करण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे राज्याला दरवर्षी 1160 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.


याशिवाय महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा बजेटमध्ये 9 महिन्यांवरून 12 महिने करण्यात आली आहे. 500 कोटी रुपये खर्च करून हवामान बदलासाठी केंद्र स्थापन केले जाईल. राज्यातील सर्व बचतगटांना 20,000 कोटी रुपये क्रेडिट म्हणून वितरित केले जाणार आहे


अर्थमंत्री म्हणाले, राज्यातील सर्व 79,395 छोट्या गावांमधील प्रत्येक व्यक्तीला दररोज 55 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पावले उचलली जातील. तसेच, एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 27 शहरांमध्ये भूमिगत गटार योजना लागू केली जाईल.


एआयएडीएमकेच्या सदस्यांचा सभात्याग
तामिळनाडूमध्ये, मुख्य विरोधी पक्ष एआयएडीएमकेच्या आमदारांनी निषेध म्हणून शुक्रवारी अधिवेशनादरम्यान सभागृहातून बाहेर पडले. खरेतर, स्पीकर अप्पावू यांनी विरोधी पक्षाला बोलू दिले नाही, यामुळे आमदारांनी रागाने वॉकआउट केले. अर्थमंत्री पलानीवेल त्यागराजन यांच्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणापूर्वीच विरोधी पक्षनेते के पलानीस्वामी यांनी उभे राहून बोलण्यास सुरुवात केली.


सभापती अप्पावू यांनी पलानीस्वामींना परवानगी नाकारत म्हटले की पलानीस्वामी सोमवारी बोलू शकतात. कारण, बजेट आधी सादर करावे लागेल. त्यानंतर अप्पावू यांनी राजन यांना राज्याचा पहिला पेपरलेस इलेक्ट्रॉनिक बजेट सादर करण्यास सांगितले. यावर निषेध म्हणून, AIADMK सदस्यांनी सभागृहातून वॉकआऊट केले.


तामिळनाडूचे पहिले विशेष कृषी बजेट 14 ऑगस्ट रोजी राज्याचे कृषी मंत्री एमआरके पनीरसेल्वम सादर करणार आहेत. सलग चार दिवस राज्याच्या अर्थसंकल्प आणि कृषी अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा होईल.


सर्वसामान्यांना मोठा दिलासा


तमिळनाडू सरकारने अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलवरील कर 3 रुपयांनी कमी करणे आणि प्रसुती रजा 12 महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात आणखी चांगले निर्णय येण्याची आशा सर्वसामान्यांना आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील हे पहिलेच सरकार आहे. स्टॅलिन यांच्यापक्षासोबत काँग्रेस देखील या सरकारमध्ये सहभागी आहे.