चेन्नई : तामिळनाडू विधानसभेमध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री पलानीसामी यांच्या दृष्टीने शनिवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पलानीसामी यांच्या पुढ्यात बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान आहे. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन नुकतेच पायउतार झालेले पन्नीरसेल्वम त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतात. शशिकला तुरुंगात गेल्यामुळे पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम यांच्यात सत्तासंघर्ष रंगणार आहे.

तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करण्याच्या अवघ्या एक दिवस आधी पलानीसामी गटाला मोठा धक्का बसला. आमदार आणि राज्याचे माजी पोलिस महासंचालक नटराज यांनी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा दिला आहे. नटराज यांच्या पवित्र्यानंतर 234 सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत पलानीसामींच्या कथित समर्थक आमदारांची संख्या घटून 123 वर गेली आहे.

तामिळनाडू विधानसभेत एआयएडीएमकेचे 134 आमदार आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. आर नटराज यांनी विरोधात जाण्याची भूमिका घेतल्यानंतरही पलानीसामींनी आपल्याकडे बहुमतापेक्षा 5 आमदार जास्त (123) असल्याचा दावा केला आहे.

नव्या सरकारला सदनात बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला यांचे निकटवर्तीय असणाऱ्या पलानीसामी यांनी दोनच दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

शशिकलांचं समर्थ करणारे आमदार चेन्नईपासून 80 किलोमीटर दूर कुवाथुरच्या रिसॉर्टमध्ये राहत आहेत. आमदारांना एकत्र ठेवण्याचं आव्हान पलानीसामींसमोर आहे. पलानीसामींना बहुमत सिद्ध करु न देण्यासाठी पन्नीरसेल्वम यांच्या गटाचेही जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी पलानीसामी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदार करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनेही विरोधात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पन्नीरसेल्वम यांच्याकडे 11 आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र पलानीसामी गटातील आणखी काही आमदारांना आपल्याकडे खेचण्यात पन्नीरसेल्वम यांना यश आलं तर ते अल्पमतातील सरकार स्थापन करु शकतात.

संबंधित बातम्या :


पलानीसामी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं, दोन महिन्यातील तिसरे मुख्यमंत्री


जयललितांच्या समाधीवर शशिकलांनी रागाने हात आपटले, कारण...


आत्मसमर्पणाआधी शशिकला अम्मांच्या समाधी स्थळावर


पनीरसेल्वम यांची हकालपट्टी,पलनीसामी विधीमंडळ नेतेपदी


शशिकलांना मोठा धक्का, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांचा तुरुंगवास