चेन्नई : आगामी काळात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. अशातच तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी एका अपक्ष उमेदवाराने मतदारांना अनेक गोष्टींचं आश्वासन दिलं आहे. उमेदवाराने मतदारांना दिलेल्या आश्वासनाची चर्चा सध्या संपूर्ण देशभरात होताना दिसत आहे. तामिळनाडूतील अपक्ष उमेदवाराने आपल्या मतदारसंघातील प्रत्येक घरासाठी एक मिनी हेलिकॉप्टर, एक कोटी रुपयांचं डिपॉझिट, घरात होणाऱ्या लग्नसमारंभासांसाठी सोन्याचे दागिने आणि तीन मजली घर देण्याचं आश्वासन दिलं आहे. एवढंच नाहीतर या उमेदवाराने आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांना चंद्रवारीसाठी पाठवणार असल्याचंही म्हटलं आहे.
याव्यतिरिक्त या उमेदवाराने आपल्या मतदार संघात एक रॉकेट लॉन्च पॅड, मतदार संघातील वातावरण थंड ठेवण्यासाठी 300 फुटांचा कृत्रिम बर्फाचा डोंगर, गृहिणींच्या कामाचा भार हलका करण्यासाठी रोबोट देण्याचंही आश्वासन दिलं आहे. परंतु, हा त्या उमेदवाराच्या अभियानाचा एक भाग आहे.
20 हजार रुपये उधारीवर उमेदवारी अर्ज दाखल
तामिळनाडूमधील थुलम सरवनन हा एक अपक्ष उमेदवार आहे. ज्याने 6 एप्रिल रोजी पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तामिळनाडूमधील मदुरै मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. थुलम सरवनन हा निवडणुकी प्रचारादरम्यान, मतदारांना दिलेल्या आश्वासनांमुळे चर्चेचा विषय बनला आहे. एनडीटीव्हीशी बोलताना थुलम सरवनन म्हणाला की, "माझा उद्देश राजकीय पक्षांद्वारे निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणाऱ्या उमेदवारांबाबत जागृतता वाढवणं हाच आहे. माझं असं म्हणणं आहे की, राजकीय पक्षांनी चंगले उमेदवार निवडावेत. जे विनम्र असतील. त्याचसोबत त्याच बरोबर नेत्यांनी दिलेल्या मोठ्या आश्वासनांनाबाबत सत्य समोर आणण्याचंही माझं ध्येय आहे."
दरम्यान, सरवनन आपल्या गरीब वृद्ध आई-वडिलांसोबत राहतो. त्याने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 20 हजार रुपये उधार घेतले आहेत. थुलम सरवननने आपलं निवडणुक चिन्ह कचऱ्याचा डब्बा ठेवला आहे. आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, "मदुरै दक्षिण क्षेत्रातील प्रिय मतदारांनो, लाच न घेता, भ्रष्टाचाराशिवाय ईमानदारीने कारभार करण्यासाठी कचऱ्याच्या डब्ब्याला मत द्या."
सरवननने खरं तर आपल्या प्राचारामधून राजकारण्यांचा खरा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. सरवननचं म्हणणं आहे की, ज्याप्रकारे निवडणुकी दरम्यान, काही राजकीय पक्ष आणि नेते एखादी वस्तु किंवा पैशांची लाच देतात. परंतु, कोणीच स्वच्छ हवा, शुद्ध पाणी देऊ असं आश्वासन देत नाही. अशा नेत्यांमुळे राजकारण प्रदुषित झालं आहे. निवडणुकीदरम्यान, नेते मतदारांना भुरळ घालण्यासाठी लालच देतात, ज्यामुळे मतदार योग्य नेता निवडू शकत नाहीत.
दरम्यान, तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणुक पार पडणार आहे. तामिळनाडूत सध्या ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कषगम (AIADMK) पक्षाची सत्ता आहे. तर इ पलानीस्वामी मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत AIADMK ने 136 आणि मुख्य विरोधी पक्ष डीएमकेने 89 जागांवर विजय मिळवला होता. तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 118 जागांची गरज आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :