नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे सर्वच जण हैराण आहेत. देशात,राज्यात लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घरीच बसावे लागते आहे.अत्यावश्यक सेवा सुरू असल्या तरीही अनेक यात अनेक घटक भरडले जात आहेत. लॉकडाऊनमध्ये  प्रसुती वेदना होत असलेल्या महिलेच्या मदतीला दोन पोलिस अधिकारी देवासारखे मदतीला धावून आले. पोलिस अधिकाऱ्यांनी या महिलेला सुखरूप रूग्णालयात पोहचवले. ज्या पोलीस अधिकाऱ्यानी मदत केली त्याच्या नावावरून आपल्या मुलाचे नाव ठेवले. लॉकडाऊन दरम्यान लोकांना मारहाण करणारे पोलिसांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असताना उत्तर प्रदेशात पोलिसांनी केलेल्या या मदतीचे सगळीकडे कौतुक होत आहे


तमन्ना अली असे या महिलेचे नाव आहे. प्रसुती वेदना होत असताना तमन्ना एकटीच होती. तिचा पती अनिस लॉकडाऊनमुळे नोएडामध्ये अडकला होता. त्यामुळे तो येण्याची शक्यता नव्हती. अशा परिस्थितीत तमन्नाच्या पतीने बरेलीचे एसएसपी शैलेश पांडे यांना फोन केला आणि मदत मागितली. पांडे यांनी नोएडाचे अॅडिशनल कमिशनर डीसीपी रणविजय सिंह यांच्याशी संपर्क केला आणि तमन्नाच्या पतीला बरेलीत येण्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यासोबत तमन्नाला रूग्णालयात पाठवले. तमन्नाचा पती रूग्णालयात पोहचल्यानंतर तमन्नाने मुलाला जन्म दिला.

मुलाला जन्म दिल्यानंतर जेव्हा तमन्नाला कळाले की, रणविजय सिंह यांच्या मदत केल्यामुळे तिचे पती रूग्णालयात पोहचले. त्यानंतर आभार मानण्यासाठी एक व्हिडीओ रूग्णालयात बनविला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला. तमन्ना हा बरेली येथील इज्जतनगरचा रहिवासी आहे. त्या व्हिडिओमध्ये म्हणाली, 'मी आयुष्यभर पोलिस प्रशासनाचे उपकार कधीचं विसरणार नाही. एक दिवस मी जितकी दु: खी आणि अस्वस्थ होते, आज मी तेवढीच आनंदी आहे. बरेली आणि नोएडा पोलिसांच्या मदतीने माझे पती माझ्या आणि आमच्या मुलाच्या जवळ आहे'. रणविजय सिंह यांनी केलेल्या मदतीमुळे तमन्ना सुखरूप आहे. त्यामुळे तीने आपल्या मुलाचे नाव रणविजय ठेवले.

तमन्ना अली खानचे बिहारच्या आर्ट बेल्टमधील रहिवासी अनीस खानशी लग्न झाले. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले.त्यामुळे तमन्ना बरेली येथे आणि पती नोएडामध्ये अडकला. लॉकडाऊनमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या कामात व्यस्त असलेल्या रणविजय यांना या प्रकरणाचे गांभीर्य समजले आणि त्यांनी स्वत: प्रकरण हाताळले आणि तमन्नाला मदत केली.