नवी दिल्लीः मथुरा ते पलवल या मार्गावर भारतातील सर्वात वेगवान ट्रेन टॅल्गोची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या मार्गावरील 84 किमीचं अंतर टॅल्गोने केवळ 37 मिनिटात पार करुन भारतीय रेल्वेच्या एका नवीन विक्रमाची नोंद केली. भारतीय रेल्वेच्या ताफ्यात वेगवान स्पॅनिश टॅल्गो ट्रेन सामील होण्यास सज्ज झाली आहे.


 

 

मथुरा आणि पलवल या मार्गावर टॅल्गो 180 किमी प्रति तास वेगाने चालवण्यात आली. टॅल्गो मथुरा जंक्शन येथून सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी पलवलसाठी रवाना होऊन पलवल येथे 12 वाजून 5 मिनिटांनी पोहचली. टॅल्गोने हे अंतर केवळ 37 मिनिटात पार केलं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

अशी झाली चाचणी

 

मथुरा आणि पलवल या मार्गावर अजून 20 दिवस चाचणी घेण्यात येणार आहे. या मार्गावर टॅल्गो पहिल्या दिवशी 120 किमी प्रति तास वेगाने चालवण्यात आली. त्यानंतर अनुक्रमे 130,140,150,160,170 वेगाने चालवण्यात आली. या मार्गावर 13 जुलै रोजी 180 किमी प्रति तास वेगाने टॅल्गोची यशस्वी चाचणी पार पडली, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

लवकरच मुंबई-दिल्ली मार्गावर चाचणी

रेल्वे मंत्रालयाने मुंबई-दिल्ली या मार्गावर टॅल्गो ट्रेन चालवण्यासाठी परवानगी दिली आहे. मथुरा आणि पलवल या मार्गावरील चाचणी पूर्ण झाल्यानंतर मुंबई-दिल्ली मार्गावर टॅल्गो चालवण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. अंदाजे ऑगस्टमध्ये मुंबई-दिल्ली मार्गावर चाचणी घेण्यात येईल असा अंदाज आहे.

 

संबंधित बातम्याः


200 किमी प्रतितास वेगाने धावणारी टॅल्गो ट्रेन!


...तर मुंबईहून दिल्ली अवघ्या आठ तासात गाठता येणार!

हायस्पीड टॅल्गो ट्रेनची आज चाचणी, लवकरच दिल्ली-मुंबई मार्गावर धावणार