दिल्ली: मुंबई 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याला अखेर भारतात आणण्यात आले आहे. त्याला अमेरिकेतून प्रत्यार्पणाद्वारे आणण्यात आले होते आणि आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) त्याची चौकशी करत आहे. एनआयए चौकशीदरम्यान, राणाला मुंबई हल्ल्यांबद्दल, आयएसआयशी असलेल्या त्याच्या संबंधांबद्दल आणि लष्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी संघटनांबद्दल अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. ज्यामुळे 26/11च्या हल्ल्याच्या कट रचण्याबाबत आणि त्यात सहभागी असलेल्या नेटवर्कबाबत महत्त्वाचे दुवे मिळू शकतात.

तहव्वूर राणा याची आज तिसऱ्या दिवशी चौकशी होणार असल्याची माहिती आहे. काल (शनिवारी) एनआयएने त्यांची सुमारे साडेचार तास चौकशी केली. एनआयए टीमने पुरावे समोर ठेवून राणाची चौकशी केली आहे. तहव्वूर राणाने पुन्हा चौकशीत सहकार्य केले नाही. एनआयए लवकरच राणा आणि मिस्टर B या दोघांना समोरासमोर आणण्यात येणार आहे.  एनआयएचे गुप्तचर साक्षीदार मिस्टर B बी हा तोच व्यक्ती आहे, ज्यांनी 2006 मध्ये डेव्हिड हेडली मुंबईत आला तेव्हा त्याचे स्वागत केले होते आणि त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यासह सर्व आवश्यक व्यवस्था केली होती. राणानेच मिस्टर बीला फोन करून हेडलीची व्यवस्था करण्यास सांगितले. एनआयएच्या मते, हा साक्षीदार मिस्टर B राणाच्या खूप जवळचा आहे आणि त्याच्याकडे अनेक महत्त्वाची माहिती असू शकते.

तहव्वूर राणा यांची आतापर्यंत दोन दिवस चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीच्या पहिल्या दिवशी राणाने सांगितले की, तो कॉलेजमध्ये डेव्हिड हेडलीला भेटला होता. राणाने चौकशीदरम्यान सांगितले की, त्यानी लष्कर-ए-तैयबा आणि हरकत-उल-जिहाद-इस्लामीच्या छावण्यांनाही भेट दिली. तोही पाक आर्मी आणि आयएसआयच्या लोकांसोबत गणवेश घालून आला होता. सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणा यानी एनआयएला सांगितले, तो लष्कर छावणीत गेला आहे. तो हरकत-उल-जिहाद कॅम्पमध्येही गेला होता. तो पाक आर्मीचा गणवेश घालायचा.आयएसआय लोकांसह छावणीला भेट दिली आहे. 

राणाच्या जवळच्या सहकाऱ्यांचा शोध सुरू

एनआयए राणाला तो ज्या लोकांशी संबंधित होता, त्यांच्याबद्दलही चौकशी करत आहे आणि भारतात इतर कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यात आली होती का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी सांगितले की, राणा एनआयएला चौकशीत मदत करत नाहीयेत आणि अस्पष्ट उत्तरे देऊन वेळ वाया घालवत आहे. तो 'मला माहित नाही', 'मला आठवत नाही' अशी उत्तरे देत आहे.