मुंबई : 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला भारताला सोपवल्यानंतर आता अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसकडून एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामध्ये राणा आणि हेडलीसंबंधी काही खुलासे करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर 'भारतीयांची हीच लायकी आहे' असं राणाने हेडलीला म्हणाल्याचा उल्लेख अमेरिकेच्या पत्रात आहे. तसेच या हल्ल्यात लष्कर ए तोय्यबाच्या ज्या 9 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला त्यांचा पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च पुरस्कार निशान-ए-हैदर देऊन गौरव करायला हवा असंही राणाने हेडलीला म्हटल्याची माहिती आहे.  

 

मुंबईतील 26/11 हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेने भारताच्या हवाली केलं आहे. राणाला आता 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टीसकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबई हल्ल्याच्या आधी डेविड हेडली आणि तहव्वूर राणा यांच्यामध्ये अनेकदा भेटी झाल्याचं त्यामध्ये म्हटलं आहे. तहव्वूर राणाला 2013 साली अमेरिकेने 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. 

एनआयएकडून राणाची चौकशी सुरू

26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाची कसून चौकशी सुरू आहे. एनआयएची 12 अधिकाऱ्यांची टीम राणाची चौकशी करत आहे. उप महानिरीक्षक जया रॉय या टीमचं नेतृत्व करत आहेत. चौकशी सुरू होण्याआधी या संपूर्ण टीमची एनआयचचे महासंचालक सदानंद दाते यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतरच चौकशीला सुरुवात झाली. चौकशीच्या अखेरच्या टप्प्यात राणाचा संपूर्ण जबाब रेकॉर्ड केला जाणार आहे.

ही बातमी वाचा: