नवी दिल्ली : स्विस बँकेत भारतीयांचा किती पैसा आहे, हा नेहमीच कुतूहलाचा विषय असतो. मात्र आता स्विस बँकेत काळा पैसा लपवणाऱ्यांचं पितळ उघडं पडणार आहे. स्विस बँकेत असलेल्या भारतातील खातेदारांनी माहिती बँकेने भारत सरकारला सोपवली आहे.


स्विस बँकेत 75 देशातील 3.1 मिलियन म्हणजे 31 लाख खातेदारांची माहिती सरकारने त्या देशांना सोपवली आहे. यात काही भारतीय खातेदारांची माहिती स्विस बँकेने भारताला सोपवली आहे. तर पुढील वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये स्विस बँक भारताला आणखी खात्यांची माहिती देणार आहे. काळा पैशांविरोधातील लढाईतील हे महत्त्वाचं पाऊल आहे. स्विस बँकेने काही निवडक देशांनाच आपल्या खात्यांची माहिती दिली आहे.


भारत आणि स्वित्झर्लंड सरकारमध्ये बँकिंग माहितीच्या देवाण-घेवाण संबंधीचा करार (ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉरमेशन) झाला होता. त्यामुळे स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती उघड होणार हे निश्चत होतं. या करारानुसार स्वित्झर्लंड सरकारने स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती भारत सरकारला दिली आहे.



स्विस बँकेत खातं असणाऱ्या भारतीयांच्या पैशात घट


स्वित्झर्लंडने 1987 पासून स्विस बँकेची माहिती सार्वजनिक करण्यास सुरुवात केली. यावर्षी जून महिन्यात मिळालेल्या माहितीनुसार, स्विस बँकेत खातं असणाऱ्या भारतीयांचा पैसा 20 वर्षात दुसऱ्यांदा सर्वात कमी झाला. 2018 मध्ये स्विस बँकेत जमा असलेल्या भारतीयांचा पैसा जवळपास 6 टक्क्यांनी कमी झाल्यानंतर ही रक्कम घटून 95.5 कोटी स्विस फ्रँक म्हणजे 6757 कोटी रुपये झाली होती. याआधी 1995 मध्ये हा आकडा 72.3 कोटी स्विस फ्रँक झाला होता.  मात्र हा सगळा काळा पैसा असल्याची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.


संबंधित बातम्या