Swati Maliwal Case: नवी दिल्ली : आपच्या (Aam Admi Party) खासदार स्वाती मालीवाल प्रकरणी (Swati Maliwal Case) दिल्ली पोलीस (Delhi Police) अॅक्शन मोडमध्ये आहेत. स्वाती मालीवाल यांचा विनयभंग केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे पीए विभव कुमार (Vibhav Kumar) यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन देखील दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.


आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या आरोपांमुळे दिल्लीचे राजकारण तापले आहे. स्वाती मालीवाल यांच्या आरोपांमुळे दिल्लीपासून ते देशाच्या राजकारणात चर्चा रंगत आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा असलेल्या स्वाती मालीवाल यांच्या पद आणि मालमत्तेबाबतही चर्चा सुरु आहेत. स्वाती मालीवाल यांनी यावर्षी जानेवारीत झालेल्या राज्यसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा तपशील दिला होता. विशेष म्हणजे त्यांनी शेअर आणि बाँड मार्केटमध्येही गुंतवणूक केल्याचे नमूद केले आहे. स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती आहे, जाणून घ्या...


8,90,811 रुपयांची शेअर्समध्ये गुंतवणूक-


एडीआरच्या अहवालानुसार, या वर्षी जानेवारीमध्ये स्वाती मालीवाल यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती 19,22,519 रुपये असल्याचे घोषित केले. यापैकी फक्त 20,000 रुपये रोख, 32,000 रुपये बँक ठेवी आहेत तर 8,90,811 रुपये शेअर्समध्ये गुंतवले आहेत. याशिवाय स्वाती मालीवाल यांनी पोस्ट ऑफिस बचत योजनेत 3 लाख रुपये गुंतवले आहेत, तर त्यांनी एलआयसीमध्ये 17,138 रुपये गुंतवले आहेत.


पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपनीचे शेअर्स?


स्वाती मालीवाल यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये एशियन पेंट्स, फाइन ऑरगॅनिक्स, पिडीलाइट, टीसीएस, टायटन आणि इतर अनेक शेअर्सचा समावेश आहे, ज्यामध्ये त्यांचे जवळपास 9 लाख रुपयांचे एक्सपोजर आहे.


ना गाडी, ना कर्ज-


याशिवाय स्वाती मालीवाल यांच्याकडे 6,62,450 रुपयांचे दागिने आहेत. या सर्व गुंतवणुकीची किंमत 19,22,519 रुपये आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये स्वाती मालीवाल यांनी प्राप्तिकर रिटर्नमध्ये 24,12,470 रुपयांचे उत्पन्न घोषित केले आहे. हे सर्व असूनही स्वाती मालीवाल यांच्याकडे ना कार आहे ना कोणत्याही प्रकारचे कर्ज आहे.


नेमकं प्रकरण काय?


स्वाती मालीवाल सोमवारी अरविंद केजरीवाल यांच्या घरी गेल्या होत्या. त्या तिथे केजरीवाल यांची वाट पाहात होत्या. तेव्हाच तिथे विभव कुमार आले आणि त्यांनी मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केले. याची माहिती त्यांनी 112 वर फोन करत पोलिसांना दिली. यानंतर स्वाती मालिवाल यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाणे गाठले.सदर घटनेनंतर आम आदमी पक्षानेही प्रतिक्रिया दिली होती. ही घटना निंदनीय असून मुख्यमंत्री याप्रकरणी कारवाई करतील असंही आपकडून स्पष्ट करण्यात आलं. आपचे खासदार संजय सिंह यांनीही स्वाती मालिवाल यांची भेट घेतली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) विभव कुमार यांना समन्स बजावले आहे.


कोण आहे स्वाती मालीवाल? 


2015 मध्ये स्वाती मालीवाल दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख बनल्या. अलीकडेच आम आदमी पक्षाने त्यांना दिल्लीतील राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवार केले होते. 31 जानेवारी रोजी त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. वडिलांवर केले होते लैंगिक शोषणाचे आरोप- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना स्वाती मालीवाल यांनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबाबत मोठा खुलासा केला होता. वडिलांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप स्वामी मालीवाल यांनी केला होता. रागाच्या भरात वडील तिचे केस धरून तिला मारहाण करायचा. त्यामुळे भीतीने ती अनेकदा पलंगाखाली लपून बसायची. तिने अशाच अनेक रात्री लपून काढल्या आहेत, असं स्वाती मालीवाल यांनी सांगितले.