Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची उत्सुकता शिगेला पोहचली असून भाजपकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे. तर, दुसरीकडे रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमात शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम हा हिंदू धर्मातील शास्त्र, विधींनुसार होत नसून त्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आक्षेप स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी घेतला आहे. शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी सनातन धर्माच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. आमचं कोणीही बिघडू शकत नाही, त्यामुळे कोणीही आम्हाला आव्हान देऊ नये असेही त्यांनी म्हटले. शास्त्रोक्त पद्धतीने देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा न केल्यास त्यात भूत-पिशाच्च वास करतात आणि परिसराला उद्धवस्त करतात, असेही शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले.
'एमी तक' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शंकराचार्य यांनी म्हटले की, शंकराचार्यांच्या व्यासपीठांना जो आव्हान देतो, त्याचे अस्तित्व राहत नाही. स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी पुढे म्हटले की, मी आधीच सांगितले होते की, हिमालयावर जो प्रहार करतो, त्याचा हात तुटतो. आमच्यासोबत संघर्ष करणे चुकीचे आहे. शेकडो अणूबॉम्ब आम्ही आमच्या नजरेने नष्ट करू शकतो, तेवढी आमच्यात क्षमता आहे. आम्ही निवडणुकीतून या पदावर आलो नाहीत. त्यामुळे सत्तेवर असलेले आमचं काही वाईट करू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले.
शंकराचार्य हे राज्यकर्त्यांवर राज्य करणारे आहेत...
स्वामी निश्चलानंद म्हणाले, 'जर कोणी या सिंहासनाशी खेळण्याचा प्रयत्न केला, तो कितीही मजबूत असला तरी तो सुरक्षित राहू शकणार नाही. मी जनतेला भडकावत नाही, पण जनता आमचा शब्द पाळते. जनमत आमच्या पाठीशी आहे, धर्मग्रंथांचे मतही आमच्या पाठीशी आहे, ऋषींचे मतही आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आम्ही सर्व बाबतीत बलवान आहोत आणि कोणीही आम्हाला दुर्बल समजू नये, असेही शंकराचार्यांनी सूचित केले. खऱ्या-खोट्या शंकराचार्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल हे खोटे नसतात, मग शंकराचार्यांची पदे यापेक्षा वाईट आहेत का? ते पुढे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांवर सत्ता गाजवण्याचे पद आमचे आहे, असेही त्यांनी म्हटले.
पीएम मोदी आणि सीएम योगीबद्दल शंकराचार्य काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत शंकराचार्य म्हणाले, 'मी त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ओळखतो. पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीही ते माझ्याकडे आले होते आणि माझ्याकडून किमान चुका व्हाव्यात म्हणून त्यांना आशीर्वाद देण्यास सांगितले होते आणि आता ते एवढी मोठी चूक करणार आहेत.
राम मंदिराचे उद्घाटन शास्त्रीय पद्धतीने नाही
स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले की, प्रभू राम यांची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापणा होत नाही. त्यामुळे राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणे योग्य नाही. त्याशिवाय, आम्हाला एका व्यक्तीसोबतच उद्घाटनात येण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. आम्हाला आमंत्रणावर नाही तर कार्यक्रमावर आक्षेप आहे. शंकराचार्य यांनी म्हटले की, प्राणप्रतिष्ठापणेसाठी मुहूर्ताकडे लक्ष ठेवणे आवश्यक होते. कोणी मूर्तीला स्पर्श करावा, कोणी करू नये, कोणी प्रतिष्ठापणा करावी, कोणी करू नये याकडे लक्ष देणे आवश्यक होते. स्कंद पुराणानुसार, देवी-देवतांच्या मूर्ती शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापणा केल्यास त्यामध्ये तेज येईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
शंकराचार्य यांनी म्हटले की, विधीवत प्राणप्रतिष्ठा न झाल्यास मूर्तीमध्ये भूत-प्रेतांचा वास
शंकराचार्य यांनी म्हटले की, शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठापणा न केल्यास, शास्त्रांचे पालन न केल्यास देवांच्या मूर्तींमधील तेज कमी होते. शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापणा न केल्यास भूत-प्रेत, पिशाच्च या मूर्त्यांमध्ये वास करतात आणि संपूर्ण परिसराला, क्षेत्राला उद्धवस्त करतात, असेही शंकराचार्य यांनी म्हटले. प्राणप्रतिष्ठापणा, मूर्ती प्रतिष्ठापणा हा काही खेळ नाही. यामध्ये दर्शन, व्यवहार आणि विज्ञान तीन हे एक तत्व आहे.
पंतप्रधान मोदीं यांनी दोन वर्षानंतरही राम मंदिराचे उद्घाटन केले असते तरी आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापणा होणार की नाही असाच प्रश्न विचारला असता, असेही त्यांनी म्हटले.