मुजफ्फराबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गेल्या शुक्रवारी एका सभेत म्हटलं होतं की, त्या दिवसाची वाट पाहतोय, ज्या दिवशी काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल. नवाज शरीफ यांच्या या विधानावर भारताने त्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या शरीफ यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, “शरीफ यांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पाकिस्तानने काश्मीरमध्ये दहशतवादाशिवाय काहीही केलं नाही. किंबहुना, नवाज शरीफ हे ज्या वानीला शहीद घोषित करातात, तो वानी हा हिजबुलचा कमांडर होता, हे शरीफ यांना माहित आहे का?”
पाकव्याप्त काश्मीरमधील ‘आजद जम्मू और काश्मीर’च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या म्हणजेच पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजच्या विजयानिमित्त सभेत नवाज शरीफ बोलत होते. त्यावेळी त्यांनी काश्मीरवर विधान केलं होतं. त्यांच्या विधानाला अखेर भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं आहे.