इस्लामाबाद/ नवी दिल्ली : हृदयाच्या आजाराने त्रस्त पाकिस्तानच्या एका दीड महिन्याच्या मुलावर उपचारासाठी भारताकडून व्हिसा मंजूर केला आहे. त्या मुलाच्या वडिलांनी यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं होतं. यावर सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाने हस्तक्षेप करत मेडिकल व्हिसा मंजूर केला.


पाकिस्तानी नागरीक केन सिड यांच्या मुलाला हृदयाचा आजार असून, त्यावर उपचार पाकिस्तानात उपलब्ध नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून ते भारतीय व्हिसासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे सिड यांनी ट्विटरवरुन स्वराज यांना आपल्या मुलाच्या आजाराची माहिती देऊन, वैद्यकीय उपचारासाठी मेडिकल व्हिसाची मागणी केली होती.

यावर सुषमा स्वराज यांनी सांगितलं की, ''तुमच्या मुलाला त्रास सहन करावा लागणार नाही. कृपया पाकिस्तानातील भारतीय हाय कमिशनशी संपर्क साधावा. आम्ही तुम्हाला मेडिकल व्हिसा उपलब्ध करुन देऊ.''

यानंतर मुलाच्या वडिलांनी सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, भारतीय उच्चायोगातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांसाठी सिड कुटुंबीयांना मेडिकल व्हिसा उपलब्ध करुन दिला आहे. याने त्यांना भारतात आपल्या मुलावर उपचार करणं शक्य होईल.

तर दुसरीकडे आणखी एका प्रकरणात सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या वकिलांना पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज आजीज यांना शिफारीश करण्यास सांगितलं आहे.