जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कराच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून यामध्ये एक जवान शहीद झाला असून पाच जवान जखमी झाले आहेत. लष्कराच्या तुकडीला लक्ष्य करुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. श्रीनगरपासून शंभर किमी दूर जम्मू-काश्मीर हायवेवर हा हल्ला झाला.


दरम्यान, जखमी जवानांना रुग्णालयात नेण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसंच हल्लेखोर दहशतवाद्यांचाही कसून शोध सुरु आहे.


पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार:

काल रात्री उशिरा जम्मू-काश्मीरच्या पुँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. रात्रभर पाकिस्तानकडून थोड्या-थोड्या वेळानं गोळीबार सुरुच होता.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्करानंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.