नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सौदी अरेबियात नोकरी गमावलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सौदीत दावा दाखल करून, मायदेशी परतावे, आणि येथूनच न्यायालयीन प्रक्रीयेला सामोरे जावे, असा सल्ला स्वराज यांनी दिला आहे.


 

त्यांचा परतण्याचा सर्व खर्च केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येईल, असेही परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

 


 

''सौदीमधील भारतीय कामगारांनी कृपया आपले दावे दाखल करून मायदेशी परतावे, आम्ही तुम्हाला विनाशुल्क मायदेशी परत घेऊन येऊ.'' असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 



तसेच सौदी सरकार बंद कंपन्यांकडून वसूली करेल, तेव्हा त्यातून तुमची द्येयकं मिळतील, असा विश्वासही स्वराज यांनी सौदीतील भारतीयांना दिला आहे.

 

न्यायालयीन प्रक्रियेत वेळ लागणार असल्याने अनिश्चित काळापर्यंत सौदीमध्येच राहून वाट पाहण्यात काहीच अर्थ नसल्याचेही, त्या म्हणाल्या.