नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ सार्वजनिक न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा व्हिडीओ मीडियामध्ये सार्वजनिक करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही.


पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईवरुन देशभरात राजकारणाला ऊत आला आहे. काँग्रेसचे संजय निरुपम  आणि आम आदमी पक्षाने सरकारकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ जारी करण्याविषयी चर्चा सुरु होती.

मात्र यामुळे चुकीचा पायंडा पडेल अशी भीती सरकारला वाटत असल्याने हा व्हिडीओ सार्वजनिक न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

केवळ सुरक्षा समितीलाच हा व्हिडिओ दाखवला जाणार आहे. 14 ऑक्टोबरला समितीच्या बैठकीत व्हिडीओ जारी होईल. या समितीत एकूण 31 खासदार आहेत.

या समितीत भाजप खासदार बी सी खंडूरी, मुरली मनोहर जोशी, सुब्रमण्यम स्वामी, ओम माथूर, काँग्रेस खासदार कॅप्टन अमरिंदर सिंह, अंबिका सोनी, अभिषेक मनु सिंघवी, मधुसूदन मिस्त्री, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे.