Suprim Court On Gyanvapi Masjid: ज्ञानवापी मशिदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करत एक महत्वपूर्ण आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला निर्देश देत म्हटले आहेत की, ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले ती जागा सुरक्षित ठेवण्यात यावी. तसेच लोकांना नमाज पठण करण्यापासून रोखू नये. तत्पूर्वी, सोमवारी एका स्थानिक न्यायालयाने हिंदू पक्षाच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, ज्ञानवापी मशीद संकुलाचा भाग सील करण्याचे आदेश दिले होते, जेथे कथितरित्या शिवलिंग सापडले होते. तसेच येथे नमाज पठण करत असलेल्या लोकांची संख्याही मर्यादित केली होती. आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. 


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर उत्तर प्रदेशचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, मशिदीमधील हात पाय धुण्याची जागा असलेल्या ठिकणी शिवलिंग सापडले आहे. प्रार्थनेचे ठिकाण वेगळे आहे. या ठिकाणी शिवलिंगाला इजा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले की, आम्ही सुरक्षेचे आदेश देऊ. मेहता पुढे म्हणाले की, संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मला उद्या माहिती द्यायची आहे. तुमच्या आदेशाचा कोणताही नको असलेला परिणाम होऊ नये, अशी आमची इच्छा आहे.


यानंतर अंजुमन इंतेजामिया मशीद समितीतर्फे ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी युक्तिवाद सुरू केला. युक्तिवाद करताना ते म्हणाले, या आदेशामुळे तेथील परिस्थिती बदलेल. वजू केल्याशिवाय नमाज पठण करता येणार नाही. वजू करण्यासाठी ती जागा शतकानुशतके वापरली जात आहे. यावर न्यायमूर्तींनी सांगितले की, यावर गुरुवारी सुनावणी करू. तूर्तास त्या जागेच्या संरक्षणाचा क्रम आम्ही कायम ठेवू. कोणतेही शिवलिंग आढळल्यास त्याचे संरक्षण आवश्यक आहे. पण प्रार्थना आता थांबू नये. याबाबत आम्ही डीएमला सूचना देऊ.


दरम्यान, सोमवारी वाराणसी जिल्ह्यातील न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला ज्ञानवापी मशीद संकुलाचा भाग सील करण्याचे निर्देश दिले होते, जेथे शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. याच दरम्यान ज्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे, त्या ठिकाणी लोकांना प्रवेश करण्यास मनाई करावी आणि मशिदीमध्ये केवळ 20 लोकांना नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, असे न्यायालयाने म्हटले होते. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.