नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचे निकाल आता इंग्रजी सोबतच सहा प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर हे निकाल प्रसिद्ध करण्यात येतील. ही सुविधा या महिन्याच्या शेवटपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे.


हिंदी, तेलगु, आसामी, उडिया आणि मराठी या भाषांमध्ये लवकरच सर्वोच्च न्यायालयाचे निकालाच्या प्रती देण्यात येतील. 2017 मध्ये कोची येथे आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल सामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहचण्यासाठी प्रादेशिक भाषांमध्ये देण्यात यावेत अशी सूचना केली होती. त्यानंतर सरन्यायाधीशांच्या निर्देशानूसार सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाने यासाठीची तयारी सुरु केली होती. गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी देखील प्रादेशिक भाषांमध्ये निकाल देण्यासाठी सुरु प्रयत्न सुरु असल्याची माहिती काही पत्रकारांना दिली होती. यासाठी एक विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयात येणाऱ्या याचिकांच्या आधारावर या सहा भाषा निवडण्यात आल्या आहेत. म्हणजेच ज्या राज्यांमधून सर्वोच्च न्यायालयात जास्त याचिका येतात त्या राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषांची निवड करण्यात आली आहे. येत्या काळात इतर भाषांमध्येही निकालाच्या प्रती देण्यात येतील अशी शक्यता आहे.