भाजप नेत्यांच्या आचार संहिता उल्लंघनाबाबत निवडणूक आयोग उदासीन, सुप्रीम कोर्टाची आयोगाला नोटीस
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2019 05:53 PM (IST)
भाजप नेते चार आठवड्यांपासून आचारसंहितेचं उल्लंघन करत आहेत, मात्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या 40 तक्रारींवर कोणतीही सुनावणी केली नाही, हा भेदभाव असल्याचं सुष्मिता देव यांनी म्हटलं.
BENGALURU, INDIA - APRIL 3: BJP President Amit Shah and PM Narendra Modi during the BJP two-day National Executive meeting at Hotel Ashok, on April 3, 2015 in Bengaluru, India. (Photo by Hemant Mishra/Mint via Getty Images)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आचार संहितेच्या उल्लंघनाबाबत निवडणूक आयोगाने अद्यापही कोणतीही कारवाई न केल्याने आज सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली गेली आहे. कॉंग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दाखल केलेली याचिका स्वीकारली. या याचिकेत आसामच्या सिलचरमधील काँग्रेस खासदार आणि 'ऑल इंडिया महिला काँग्रेस'च्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी मोदी आणि शाह यांच्याविरोधातील आचारसंहितेचं उल्लंघनाच्या तक्रारींवर त्वरित सुनावणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी केली आहे. भाजप नेते चार आठवड्यांपासून आचारसंहितेचं उल्लंघन करत आहेत, मात्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या 40 तक्रारींवर कोणतीही सुनावणी केली नाही, हा भेदभाव असल्याचं सुष्मिता देव यांनी म्हटलं. ही मनमानी आणि अन्यायकारक वागणूक निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेसाठी धोकादायक असल्याचं देखील देव म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले 40 जवान आणि बालाकोटमध्ये हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राईकच्या नावावर मतं मागत आहेत. पंतप्रधान राजकारणात सैन्याला आणत आहेत, हे घटनाबाह्य आहे, असं अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं. यापूर्वी निवडणूक आयोगाने बसपा अध्यक्ष मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबाबत कारवाई केली होती. मोदी- शाह यांच्या आचार संहितेच्या उल्लंघनाप्रकरणी पुढील सुनावणी 2 मे रोजी होणार आहे.