पणजी : गोवा उच्च माध्यमिक शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 89.59 टक्के लागला आहे. एकूण 16 हजार 952 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 15 हजार 187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


गेल्या वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा सहा टक्क्यांनी अधिक होती. यंदाही मुलींनीच परीक्षेत बाजी मारली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 85.53 टक्के निकाल लागला होता. पर्वरी येथील मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत शालान्त मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी निकाल जाहीर केला.

यंदा परीक्षेला एकूण 8 हजार 967  मुली, तर 7 हजार 985 मुलं बसली होती. परीक्षेत उत्तीर्ण मुलांचे प्रमाण 86.91 टक्के तर मुलींची टक्केवारी 91.97 इतकी आहे.

गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक म्‍हणजे 91.86 टक्के लागला आहे. त्या खालोखाल विज्ञान शाखेचा निकाल 91.76 टक्के, कला शाखेचा निकाल 87.73 टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल 84.45 टक्के  लागला.

वाणिज्य शाखेतील 5 हजार 173 पैकी 4 हजार 752  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतील 4 हजार 819 पैकी 4 हजार 422 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतील 4 हजार 117 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 612 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर व्यावसायिक शाखेतील 2 हजार 843 पैकी 2 हजार 401 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षेत बसलेल्या 3 हजार 93 विद्यार्थ्यांना क्रीडा गुण प्राप्त झाले होते. यातील 114 विद्यार्थी क्रीडा गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. क्रीडा गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 0.75 टक्के इतकी आहे.