नवी दिल्ली : कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. युनायटेड हिंदू फ्रंटचे जयभगवान गोयल, हिंदू महासभेचे चंद्रप्रकाश कौशिक यांनी राहुल गांधींविरोधात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आज सुनावणी घेण्यात आली.

राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत मागणी करण्यात आली होती की, "गृह मंत्रालयाकडे राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत तक्रारी मिळाल्या आहेत. याप्रकरणी कोर्टाने कारवाई करत राहुल गांधींना निवडणूक लढण्यास अपात्र ठरवावे, तसेच त्यांचे नाव मतदार यादीतून वगळावे."

यापूर्वी 2015 सालीदेखील राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा विरोधकांनी उचलला होता. 2015 मध्येदेखील राहुल गांधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु त्यावेळी याचिकार्त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडलेले पुरावे कोर्टाने फेटाळले होते.

नागरिकत्वावरुन गृह मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस पाठवून 15 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते. गृह मंत्रालयाने भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवरुन राहुल यांना नोटीस धाडली होती. स्वामी यांनी दावा केला आहे की, "राहुल गांधी यांच्याकडे इंग्लंडचे नागरिकत्व आहे. ही बाब सिद्ध करण्यासाठी स्वामी यांच्याकडे पुरावेदेखील असल्याचा दावा त्यांनी केला आहे."