Delhi Excise Policy Case : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी 'आप'चे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या सहा महिन्यापासून तुरुंगात असलेल्या संजय सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. महत्त्वाचं म्हणजे ईडीने या प्रकरणात संजय सिंह यांना जामीन देण्यास काही अडचण नसल्याचं सांगितलं होतं. पण याचा परिणाम याच संबंधित इतर प्रकरणांवर होणार नाही, याचा संदर्भ इतर ठिकाणी वापरता येणार नाही अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे कथित दारू घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनादेखील दिलासा मिळणार का हे पाहावं लागेल. 


अटी कनिष्ठ न्यायालय ठरवणार


दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, संजय सिंह यांनी या प्रकरणाबाबत मीडियामध्ये कोणतेही वक्तव्य करू नये. जामिनाच्या अटी कनिष्ठ न्यायालयाने ठरवाव्यात अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. संजय सिंह यांना दिलेली सूट इतर सर्व प्रकरणांमध्ये उदाहरण म्हणून लागू करता येणार नाही असेही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 


संजय सिंह यांना जामीन मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं की, ED ने सांगितलं म्हणून संजय सिंह यांना जामीन मिळाला. पण याचा परिणाम इतर प्रकरणावर होणार नाही. तसेच या खटल्याचा संदर्भ वापरता येणार नाही.


जामीनाला ईडीचा विरोध नाही


महत्त्वाचं म्हणजे याच प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याभोवती फास आवळणाऱ्या ईडीने खासदार संजय सिंह यांच्या जामीनाला मात्र विरोध केला नाही. त्यामुळेच संजय सिंह यांना सहा महिन्यानंतर जामीन मिळाला आहे. संजय सिहं यांना जामीन मिळाल्यानंतर आप पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रकरणात काहीही पुरावे नाहीत, भाजपकडून सूड बुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
आपचे खासदार संजय सिंह सध्या तुरुंगात नसून ते रुग्णालयात आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


संजय सिंह यांना कधी अटक करण्यात आली?


दिल्ली अबकारी धोरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संजय सिंह यांना ईडीने गेल्या वर्षी 4 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्यानंतर संजय सिंह यांनी या आधीही दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र त्यांना जामीन मंजूर झाला नव्हता. 


ही बातमी वाचा: