अखेर 'ती'ला 24 आठवड्यांनी गर्भपाताची परवानगी
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2016 09:44 AM (IST)
मुंबई : बलात्कार पीडित तरुणीला 24 आठवड्यांनी गर्भपात करण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. वैद्यकीय चाचणीत तिच्या गर्भात व्यंग असल्याचं आणि त्यामुळे तरुणीच्या जीवाला धोका असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर कोर्टाने तिला गर्भपाताची संमती दिली आहे. 24 आठवड्याच्या गर्भवती असलेल्या तरुणीने सध्याच्या नियमावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात गर्भपाताची परवानगी मागितली होती. मात्र गर्भधारणेच्या 20 आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही, असा नियम असल्यामुळे या नियमाला तिने आव्हान दिलं होतं. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी अॅक्ट 1971 नुसार 20 आठवड्यापेक्षा जास्त गर्भवती महिलेला गर्भपात करता येत नाही. मात्र आईच्या जीवाला धोका असल्यास गर्भपाताला मंजुरी देता येऊ शकते. मात्र हा नियमच चुकीचा असल्याचा दावा याचिकाकर्त्या तरुणीने केला. महत्त्वाचं म्हणजे संबंधित तरुणीने बलात्कारातून गर्भधारणा झाल्याचा दावा केला आहे.