नवी दिल्ली : राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आठवडाभराने नवज्योतसिंह सिद्धूने त्याबाबतचं कारण स्पष्ट केलं.
"मला पंजाबपासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र मी माझ्या जमिनीपासून, पंजाबपासून कसा काय दूर राहू शकतो? पंजाबवासियांनी मला 4 वेळा खासदार बनवलं. पंजाबपेक्षा कोणताही पक्ष मोठा नाही. त्यामुळेच मी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला" असं सिद्धू म्हणाला.
मोदी लाटेत विरोधक बुडाले, मात्र त्यांनी मलाही बुडवलं, असा घणाघात सिद्धूने केला.
सिद्धूने आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफ डागली. मात्र भाजपचाही राजीनामा देणार का, आपमध्ये प्रवेश करणार का, या प्रश्नांची उत्तरं सिद्धूने गुलदस्त्यातच ठेवली.
भाजपवर तोफ
सिद्धूने भाजपवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. "पंजाबमध्ये पक्षवाढीसाठी मी कष्ट घेतलेत. मात्र मोदी लाटेत माझा हक्काचा मतदारसंघ काढून घेत, यांनी मलाच बुडवलं. मात्र त्यावेळीही मी काहीच बोललो नाही. पण आता मला थेट पंजाबपासूनच वेगळं करत आहेत", असं म्हणत सिद्धूने भाजवरील नाराजी जाहीर केली.
जिथं जिथं पंजाबचं हित असेल, त्या त्या ठिकाणी सिद्धू उभा राहिल, असं तो म्हणाला.
राज्यसभेचा राजीनामा
भाजपने शिफारस केलेले राज्यसभा खासदार नवज्योतसिंह सिद्धू यांनी अडीच महिन्यातच राजीनामा दिला. सिद्धू यांनी 18 जुलैला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
संबंधित बातम्या
सिद्धूचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा, 'आप'मध्ये प्रवेश?
मी राजीनामा दिला नाही, नवज्योत कौर सिद्धूंचं स्पष्टीकरण
'सिद्धू म्हणजे खोबरं तिकडे चांगभल'
डॉ. नरेंद्र जाधवांसह सहा जण राज्यसभेवर !
विनोद कांबळीचे सिद्धूबाबत वादग्रस्त ट्वीट, नंतर मागितली माफी!