BharatKaKavach : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. यापुढे रेल्वेचा प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे. नुकतीच स्वदेशी बनावटीच्या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच'ची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. सिकंदराबादमध्ये एकाच रुळावर दोन गाड्या समोरासमोर पूर्ण वेगाने आणून स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली प्रतिकूल परिस्थितीत गाड्यांची टक्कर थांबवू शकते का? याची यशस्वी चाचणी करण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने या चाचणीचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.
स्वदेशी बनावटीच्या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीच्या चाचणीदरम्यान एक ट्रेन दुसर्या ट्रेनपासून सुमारे 380 मीटर अंतरावर थांबवली. हे तंत्रज्ञान भारतात विकसित करण्यात आले असून त्याचा फायदा जगालाही होणार आहे. विशेष बाब म्हणजे या चाचणीवेळी एका ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनय कुमार त्रिपाठी बसले होते. तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बसले होते.
रेल्वेमंत्र्यांनी काल दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद विभागातील लिंगमपल्ली-विकराबाद विभागादरम्यान स्वदेशी ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच' ची चाचणी घेतली. रेल्वे मंत्र्यांसोबत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ विनय कुमार त्रिपाठी आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. आर्थिक वर्ष 2022-23 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुमारे दोन हजार किमी रेल्वे ट्रॅक संरक्षण प्रणालीखाली आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही चाचणी घेण्यात आली.
स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच' असे करेल काम
स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच' हे रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) ने भारतीय उद्योगाच्या सहकार्याने विकसित केले आहे. हे तंत्र इतकं अचूक आहे की, भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन गाड्या समोरासमोर आल्या तरी त्यांची टक्कर होणार नाही. रेड सिग्नल ओलांडताच ट्रेनला आपोआप ब्रेक लागेल. यावेळी मागूनही एखादी ट्रेन येत असेल तर ती ट्रेनही आपोआप थांबेल. ट्रेन मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत असेल तरीही दुसरी ट्रेन समोर आल्यानंतर आपोआप ब्रेक लावला जाईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या