नवी दिल्ली : आगामी काळात दहावी आणि बारावीच्या काळात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून शुभेच्छा दिल्या. परीक्षेचा काळ हा दबावात न राहता उत्सवांप्रमाणे साजरा करा, असं आवाहन मोदींनी केलं.

पंतप्रधान मोदींनी बोलताना विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत खास सल्लाही दिला. अभ्यास करताना पाच मिनिटांची का होईना, पण विश्रांती गरजेची असते, यामुळे स्मरणशक्ती वाढून अभ्यासाचं दडपण येत नाही, असं ते म्हणाले.

जास्त जागल्याने जास्त अभ्यास होतो, असा अनेकांचा समज आहे. पण शरीराला झोप आवश्यक आहे. झोपेमुळे अभ्यास करण्यासाठी आणखी फायदा होतो, असंही मोदींनी सांगितलं.

झोप घ्यायची म्हणजे झोपूनच रहायचं असं नाही. पंतप्रधानांनी सांगितलं म्हणून झोप घ्यायची, असं करु नका. नाही तर परीक्षेचा निकाल आल्यावर तुमचे पालक तुम्हाला नाही, मला बोलतील, असंही पंतप्रधान मोदी सांगायला विसरले नाही.

दरम्यान पंतप्रधानांनी सागरी सुरक्षा दलाला 40 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जवानांना शुभेच्छाही दिल्या. 1 फेब्रुवारी 2017 रोजी सागरी सुरक्षा दलाला 40 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय सागरी सुरक्षा दलाचा जगभरातील सर्वात मोठ्या 4 सागरी सुरक्षा दलांमध्ये समावेश होतो. यामध्ये पुरुषांसह महिलांही काम करतात, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असं मोदी म्हणाले.