अहमदाबाद : सध्या शालेय परीक्षा जणू थट्टेचा विषय बनला आहे. बिहारमध्ये टॉपर्स घोटाळा समोर आल्यानंतर आता गुजरातमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं आहे. बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने पेपर लिहिला. त्यानंतर स्वत:च पर्यवेक्षक बनून स्वत:लाच 100 पैकी 100 गुण दिले. मात्र एवढं करुनही तो नापासच झाला.


 

 

हर्षद सरवैया असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. या विद्यार्थ्याने लाल शाईच्या पेनने त्याची भूगोल आणि अर्थशास्त्राची उत्तरपत्रिका तपासली. त्यानंतर उत्तरपत्रिका सुपरव्हायझरकडे जमा केली. गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्याविरोधात कॉपी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

 

कशी पकडली चोरी?

 

- हर्षदचा रिझल्टही तयार झाला होता. पण बोर्डाच्या सिस्टममध्ये हे गुण भरताना कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये त्याची चोरी पकडली गेली.
- रिझल्ट अंतिम टप्प्यात असताना त्यात अनेक विसंगती आढळल्या.

 

- त्याला अर्थशास्त्रात 100 पैकी 100 गुण होते. पण त्या तुलनेत इतर विषयांत फारच कमी गुण होते.

 

बोर्डाचे सचिव जीडी पटेल म्हणाले की, "दक्ष शिक्षकांनी भूगोलच्या उत्तरपत्रिकेतील त्याची चलाखी पकडली. यात त्याला 100 पैकी 34 गुण मिळाले. मात्र अर्थशास्त्राच्या उत्तरपत्रिकेकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. अर्थशास्त्रात विद्यार्थ्याने स्वत:लाच 100 पैकी 100 गुण दिले होते."

 

कोणताही संशय येऊ नये म्हणून विद्यार्थ्याने त्याचे संपूर्ण गुण पहिल्या पानावर लिहिले नाही. त्याने प्रत्येक उत्तराला गुण दिले होते.

 

हर्षदला इतर विषयांत किती गुण?
गुजराती 13 गुण

इंग्लिश 12 गुण

संस्कृत 4 गुण

समाजशास्त्र 20 गुण

मानसशास्त्र 5 गुण

भूगोल 35 गुण

तर अर्थशास्त्रात त्याने स्वत:लाच 100 पैकी 100 गुण दिले होते.

 

 

शिक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस

हर्षद सरवैयाला परीक्षा सुधार समितीसमोर सादर करण्यात येईल आणि चूक सिद्ध झाल्यास त्याला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. या प्रकरणात जी चूक झाली आहे, ती पाहता उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात येईल, असंही जीडी पटेल यांनी सांगितलं.