नवी दिल्ली: सोशल मीडियातील अफवांमुळे होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच सोशल मीडिया धोरण आणणार आहे. सोशल मीडियात पसरणाऱ्या अफवांमुळे मागील चार महिन्यांपासून देशभरात  जमावाने 29 लोकांचे बळी घेतले आहेत.

आयटी मंत्रालयाकडे सोशल मीडिया धोरणाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.याबाबत गृहमंत्रालय सोशल मीडिया प्रतिनिधींसोबत एक बैठक घेणार आहे. या बैठकीत सोशल मीडियातून पसरवण्यात येणारे खोटे मेसेजेस कसे रोखायचे, यावर चर्चा होईल.

‘आयटी मंत्रालय आणि ट्विटर,व्हॉट्सअप तसंच फेसबुकच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात येईल. या बैठकीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल,’ असं गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.

आयटी अॅक्टच्या कलम 69 चा वापर करत अशांतता पसरवणारे मेसेजेस, फोटोज, व्हिडीओज पसरण्याआधीच ब्लॉक केले जावेत, असं या बैठकीत सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना सांगण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

केवळ अफवांमुळे जमावाकडून होणाऱ्या हत्यांची  सरकारकडून उशिरा का होईना दखल घेण्यात येत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी अफवेमुळे जमावाकडून हत्या करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद, लातुर, नंदुरबार, परभणी, धुळे या जिल्हांतून अशा घटना समोर आल्या आहेत.