नवी दिल्ली : एक कुत्रा चावला, म्हणून सर्व भटक्या कुत्र्यांना ठार करता येणार नाही, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. देशातील सर्व भटके कुत्रे नष्ट करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं हे मत नोंदवलं.
कुत्रा चावल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो, तो एक अपघात असतो. कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सर्व कुत्र्यांना ठार करा, असं म्हणणं अयोग्य असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. केरळमध्ये वाढत्या श्वानदंशांच्या घटनांमुळे याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली होती.
केरळमधील भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यात येत असल्याच्या तक्रारीनंतर सुप्रीम कोर्टाने एक समिती स्थापन केली होती. केरळ हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश जगन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे कुत्रे चावल्याची चारशे प्रकरणं आली असल्याचं याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात सांगण्यात आलं.
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुलं शाळेत जाण्यासही घाबरत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं. मात्र शाळांचा परिसर किंवा इतर ठिकाणी काही भटके कुत्रे असतील तर त्यांना सरसकट ठार करता येणार नाही, असं न्यायालयानं बजावलं.