बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गाडीवर दगडफेक
एबीपी माझा वेब टीम | 12 Jan 2018 05:42 PM (IST)
बक्सर येथील समीक्षा यात्रेदरम्यान नितीश कुमार यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. बक्सर येथील समीक्षा यात्रेदरम्यान नितीश कुमार यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. नितीश कुमार यांना यातून सुखरुप वाचवण्यात आलं. या दगडफेकीत अनेक गाड्यांच्या काचा तुटल्या आहेत. नितीश कुमार यांना सुखरुप वाचवणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाही किरकोळ जखमी झाली आहे. काही समाजकंटकांनी नितीश कुमारांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. बक्सर येथील नांदनमध्ये नितीश कुमार गेले होते. यावेळी विकासकामांमुळे नाराज असलेले गावकरी नितीश कुमारांकडे तक्रार करत होते आणि यातूनच वाद झाला. त्यानंतर जमावातील काही जणांनी दगडफेकही केली. दरम्यान, या गोंधळानंतर नितीश कुमार यांना तातडीने घटनास्थळावरुन हलवण्यात आलं आणि गावापासून 2 किमी दूर अंतरावर एका फार्मवर आणण्यात आलं, जिथे ते एका सभेला संबोधित करणार होते.