नवी दिल्ल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या काही घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी करत म्हटलं की, ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही हिंसाचाराचा निषेध करतो. दिल्लीत शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि कारवाईबद्दल राज्यातीन नेत्यांनी प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे.
अजित पवार
शेतकऱ्यांनी आधीच ट्रॅक्टर रॅली काढणार आहोत असं सांगितलेलं होतं. केंद्र सरकारने अशी टोकाची भूमिका घेऊ नये. एक शेतकरी म्हणून माझं असं मत आहे की शेतकऱ्यांच्या मागण्या या योग्य आहेत. महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.
बाळासाहेब थोरात
शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. तीन कायदे रद्द करा अशी त्यांची मागणी आहे. शेतकरी थंडीत आंदोलन करत आहेत, मात्र पंतप्रधान त्यांची साधी विचारपूस करत नाही. ते आज प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहेत, मात्र प्रजा रडत आहे. हा खरा प्रजासत्ताक आहे का? हा काळा दिवस म्हणावा लागेल. केंद्र सरकार भांडवलदार धार्जिणे आहे. शेतकरी हिंसक मार्गाने जाऊ नये, त्यांनी गांधी मार्गाने आंदोलन केलं पाहिजे. काँग्रेसने आणि महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा अंत पहिला जात आहे. 61 दिवस आंदोलन केल्यानंतर त्यांच्या मानसिकतेचा ही विचार केला पाहिजे. यातून जर शेतकरी हिंसक होत असतील तर त्याला सरकार जबाबदार आहे, बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
संजय राऊत
दिल्लीत जे झाले आहे त्याला कोणीही पाठिंबा देऊ शकत नाही. सरकारला हवे असते तर आजचा हिंसाचार रोखता आला असता. दिल्लीत जे चालले आहे त्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान कोणीही सहन करणार नाही. पण वातावरण का बिघडले? सरकार शेतकरीविरोधी कायदा रद्द का करत नाही? कोणतीही अदृश्य शक्ती राजकारण करत आहे का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
Republic Day 2021 | दिल्लीत धुमश्चक्री; ट्रॅक्टर परेडमधील 10 मोठ्या घडामोडी
वर्षा गायकवाड
दिल्लीत कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांनी 61 दिवसांपासून आंदोलन अतिशय संयमाने सुरु ठेवलं. आजही हा मोर्चा शांततेत निघाला होता अन् अचानक असं कसं झालं? दिल्लीत पोलीस कुणाचे आहेत असे प्रश्न विचारत या परिस्थितीला केंद्र सरकारच जवाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या तथा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला. शिवाय केंद्राने शेतकऱ्यांची जनभावना लक्षात घेऊन हा कायदा रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
विजय वडेट्टीवार
केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करावे या मागण्यांसाठी गेल्या 60 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत सुरू आहे. त्यांच्या मागण्या मंजूर करण्याऐवजी त्यांच्यावर आज लाठीचार्ज करण्यात आले व अश्रूधुर सोडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. सरकारच्या या कृत्याचा धिक्कार व निषेध व्यक्त करून शेतकरी आंदोलनास पाठींबा देत आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडच्या माध्यमातून शेतकरी करणार सीमोल्लंघन
बच्चू कडू
दिल्लीत शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निषेध केला आहे. पाकिस्तान आणि चीन समोर झुकणारे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसमोर झुकायला का तयार नाही? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. यासंदर्भात महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन उभं करण्यासाठी 30 जानेवारीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करून पुढील धोरण ठरविणार असल्याची माहिती बच्चू कडू यांची दिली.