श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जमावाने ड्यूटीवर असलेल्या पोलिस उपअधीक्षकाची हत्या केली. जमावाने पोलिस अधिकाऱ्याला विवस्त्र करुन दगडाने ठेचून खून केला.


पोलिस अधिकाऱ्याने गोळी झाडल्यानंतर भडकलेल्या जमावाने हे अमानुष कृत्य केलं. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून सुरक्षव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या वक्तीची ओळख पटली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिस महासंचालक एसपी वेद यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?
नौहट्टा परिसरात डीएसपी मोहम्मद अयूब पंडित जामिया मशिदीबाहेर त्यांची ड्यूटी करत होते. गुरुवारी रात्री उशिरा साडेबारा वारचा काही लोकांनी जामिया मशिदीजवळ अयूब यांना पाहिलं. मोहम्मद अयूब पंडित मशिदीतून बाहेर येणाऱ्या लोकांचे फोटो काढत होते. त्यावेळी लोकांनी अयूब पंडित यांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी आपल्या पिस्तुलमधून गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये तीन जण जखमी झाले. यानंतर भडकलेल्या जमावाने अयूब पंडित यांची दगडाने ठेचून हत्या केली. त्याआधी जमावाने त्यांना विवस्त्र केलं होतं.

घटनेवर प्रतिक्रिया
दरम्यान, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी या घटनेचा निषेध केला. पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. नाहीतर जुना काळ परत येईल, जेव्हा लोक जिप्सी पाहून पळत असत.

काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. लोकांच्या रक्षणासाठी ड्यूटी करणाऱ्या अधिकाऱ्यालाच ठेचून मारलं, असं पोलिस महासंचालक एसपी वेद म्हणाले.

पोलिस उपअधीक्षक अयूब पंडित यांना मारलं जात असताना, तिथे हजर असलेल्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिस महासंचालकांनी त्याचा अहवाल मागवला आहे.