नवी दिल्ली: केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून स्मार्ट सिटींच्या तिसऱ्या टप्प्यातील यादी आज (शुक्रवार) प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये देशातल्या ३० शहरांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील फक्त पिंपरी-चिंचवडचा समावेश करण्यात आला आहे.


याआधीच्या यादीत पुण्याचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, तेव्हा पिंपरी चिंचवडला वगळण्यात आलं होतं. यामुळं नागरिकांमध्ये नाराजी होती. यानंतर शरद पवारांनी पिंपरी-चिंचवडचं नाव स्मार्ट सिटीत येण्यासाठी प्रयत्नही केले होते. यानंतर आता या यादीत पिंपरी चिंचवडचा समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या दोन टप्प्यातील याद्यांमध्ये एकूण 60 शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आली होती. त्यामुळे आता एकूण 90 शहरं स्मार्ट सिटीसाठी निवडली गेली आहेत.

या यादीमध्ये पिंपरी चिंचवडसह तिरुअनंतपुरम, राजकोट, देहरादून, पद्दुचेरी या शहरांचाही समावेश करण्यात आला आहे.