SpiceJet Flights :  स्पाइसजेट विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. मंगळवारी रात्री विमान कंपनीच्या आयटी यंत्रणेवर रॅन्समवेअर हल्ल्याच्या प्रयत्न करण्यात आला होता. त्याच्या परिणामी आज स्पाइसजेटच्या विमान उड्डाणांना उशीर होत आहे. रॅन्समवेअर हल्ल्यानंतर आयटी टीमने परिस्थिती नियंत्रित केली असल्याचे स्पाइसजेटने सांगितले. 


विमान कंपनीने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. विमान सेवा सुरळीत करण्यात आल्याचा दावाही कंपनीने केला आहे. मात्र, सोशल मीडियावर स्पाइसजेटच्या प्रवाशांनी तक्रारी करत विमाने उशिराने असल्याचे म्हटले आहे. काही ठिकाणी तीन तास विमान उशिराने असून स्पाइटजेटचा ग्राउंड स्टाफही दिसत नसल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. स्पाइसजेटच्या विमानांना उशीर होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे. 


 











एअरलाइनकडे 91 विमानांचा ताफा आहे, त्यापैकी 13 मॅक्स फ्लाइट असून 46 विमाने ही बोईंग 737 या प्रकारातील जुनी विमाने आहेत. 


दरम्यान, स्पाइसजेटकडून विमानात इंटरनेट सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. स्पाईसजेटचे सीएमडी अजय सिंग यांनी एअरलाइनच्या 17 व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये याची माहिती दिली आहे. 


पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या स्पाइसजेट विमान सेवा नवीन मार्गावर सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय, काही नवीन सेवाही सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीचे सीएमडीने अजय सिंग यांनी सांगितले.