SpiceJet Emergency Landing : दिल्लीत स्पाईस जेटच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. उड्डाणादरम्यान विमानातून धूर येत असल्यानं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. क्रू मेंबर्सच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला असून सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.
दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही वेळानं विमानाच्या आत काळा धूर दिसू लागला. धूर पाहिल्यानंतर सर्व प्रवासी घाबरले आणि पायलटनं पुन्हा विमान दिल्ली विमानतळावर लँड करण्याचा निर्णय घेतला. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.
धूर नेमका कशाचा? तपास सुरु
स्पाइसजेटच्या या विमानात 50 हून अधिक प्रवासी होते, असं सांगण्यात येत आहे. विमान सुमारे 5000 फूट उंचीवर गेल्यावर अचानक धूर येऊ लागला. सुरुवातीला प्रवाशांना काय झाले ते समजलं नाही, मात्र धूर वाढल्यानं प्रवाशी घाबरले. त्यानंतर पायलटनं विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर लँड करण्याचा निर्णय घेतला. वैमानिकानं विमान दिल्ली विमानतळावर सुखरूप उतरवल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यादरम्यान विमानातील प्रवासी हातातील पंख्यानं धूरापासून बचाव करताना दिसले. सध्या हे विमान दिल्ली विमानतळावरील धावपट्टीवर उभं करण्यात आलं असून, त्याची तपासणी करण्यात येत आहे.
पाटण्यातही झालं होतं इमर्जन्सी लँडिंग
याआधी बिहारच्या पाटणामध्ये अशीच एक घटना समोर आली होती. ते देखील स्पाईसजेटचंच विमान होतं. पायलटनं तात्काळ इमर्जन्सी लँडिंग केलं आणि सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवण्यात आलं. त्यावेळी या विमानात 185 प्रवासी होते. हे विमान पाटण्याहून दिल्लीला जात होतं. इंजिनला आग लागण्याचे कारण बर्ड हिट असल्याचं सांगण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :