Corona Cases in India : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 17 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 17,092 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 14684 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, नव्या आकडेवारीनुसार, 1,09,568 सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान, काल (शुक्रवारी) 1 जुलै रोजी कोरोनाच्या 17,070 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. कालच्या तुलनेत आजची वाढ 0.1 टक्क्यांनी जास्त आहे. रिपोर्ट्सनुसार, देशातील पाच राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
देशातील 'या' 5 राज्यांत सर्वाधिक रुग्ण
सध्या सर्वाधिक कोरोना प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या 24 तासांत तिथे 3,904 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, काल दिवसभरात राज्यात 3249 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तामिळनाडू या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये 1739, कर्नाटकात 1073 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशभरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये या पाच राज्यांचा वाटा 72.25 टक्के आहे. केरळमध्ये 22.84 टक्के रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त
राज्यात काल (शुक्रवारी) 3249 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर काल दिवसभरात एकूण 4189 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत काल सर्वाधिक म्हणजे 978 रुग्णांची भर पडली आहे. तसेच, राज्यात काल चार कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,07,438 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.85 टक्के इतकं झालं आहे.
मुंबईत शुक्रवारी 978 रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 1896 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 84 हजार 148 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 612 झाली आहे. सध्या मुंबईत 9,710 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 978 रुग्णांमध्ये 924 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगानं वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 526 दिवसांवर गेला आहे.