नवी दिल्ली : 'लो कॉस्ट' प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या स्पाईसजेटने ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. 'स्पाईसजेट ग्रेट रिपब्लिक डे' अंतर्गत देशांतर्गत वाहतुकीसाठी 769 रुपये तर, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 2469 रुपयांपासून तिकीट दर आकारण्यात येणार आहे.


या ऑफरचा लाभ घेण्यासाठी 22 ते 25 जानेवारी दरम्यान तिकिटांची बुकिंग करणं गरजेचं आहे. या दरम्यान काढलेल्या तिकिटांवर 12 डिसेंबरपर्यंत प्रवास करता येईल. देशांतर्गत प्रवासी विमानसेवा देणारी स्पाईसजेट ही तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

स्पाईसजेटची वेबसाइट, अॅप, ट्रॅव्हल पोर्टल आणि बुकिंग एजंट यांमार्फत बुक करण्यात येणाऱ्या तिकिटांवरही या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी REP 69 हा प्रोमो कोड वापरावा लागेल. ही ऑफर केवळ एकेरी प्रवासासाठीच लागू होणार असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, ग्रुप बुकिंगवर ही ऑफर लागू होणार नाही. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर ही ऑफर उपलब्ध आहे. या शिवाय मोबाइल अॅपवरून बुक करण्यात येणाऱ्या तिकिटांवर विशेष सवलतही मिळणार आहे.