नवी दिल्ली : "कोरोना व्हायरसमुळे आलेल्या साथीच्या रोगामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारला देशातील लोकांपर्यंत पैसे पोहोचवावे लागतील. अमेरिकेने असं केलं आहे तर आपणही करु शकतो," असं वक्तव्य भारतीय वंशाचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी केलं. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कोरोना संकट आणि अर्थव्यवस्था मुद्द्यावर आज (5 मे) अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी बातचीत केली.


"ही साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही आणि जे उपाय केले जात आहेत, त्यावरुन सध्याची मोठी चिंता आहे की अर्थव्यवस्था पुन्हा कशी स्थिरस्थावर होईल? पण आपल्याला आशावादी राहायला हवं की देशाची आर्थिक स्थिती सुधारेल. फक्त योग्य निर्णय घेतले जावेत," असं अभिजीत बॅनर्जी म्हणाले.


लोकांच्या हातात पैसे द्यायला हवे
"कोरोना संकटामुळे डगमगलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी देशातील मोठ्या लोकसंख्येच्या हातात थेट पैसे पोहोचवावे लागतील," असं अभिजीत बॅनर्जी म्हणाले. राहुल गांधी यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या चर्चेदरम्यान बॅनर्जी यांनी या मुद्द्यावर जोर दिला की, "भारत सरकारने अमेरिका किंवा इतर देशांप्रमाणे मोठं प्रोत्साहन पॅकेज द्यायला हवं, जेणेकरुन लोकांच्या हातात पैसा येईल आणि बाजारात मागणी वाढेल."


"मागणीची कमतरता हा प्रमुख मुद्दा आहे. लोकांच्या हातात पैसे दिले तर अर्थव्यवस्थेचं चाक फिरवता येईल. अमेरिका हे मोठ्या प्रमाणावर करत आहे. आपणही असं करु शकतो. तिथे रिपब्लिकन सरकार आहे, जे काही फायनान्सर चालवतात. तिथे समाजवादी विचारसरणीचं उदारमतवादी सरकार नाही. पण लोक आहेत जे आर्थिक क्षेत्रात काम करतात. अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी लोकांच्या हातात पैसा दिला पाहिले असा त्यांनी निर्णय घेतला. आपल्याला यातून बोध घ्यायला हवा, असं मला वाटतं," असं अभिजीत बॅनर्जी म्हणाले.





'न्याय'च्या धर्तीवर पैसे देता येतील का?
'न्याय' योजनेच्या धर्तीवर लोकांना पैसे दिले जाऊ शकतात का असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. त्यावर अभिजीत बॅनर्जी म्हणाले की, "निश्चितच. तसंच जर आपण 60 टक्के गरीब जनतेच्या हातात काही पैसे दिले तर चुकीचं काहीच होणार नाही. हे एकप्रकारचं प्रोत्साहन असेल. शिवाय ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना किमान तीन महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात रेशन कार्ड द्यावं, जेणेकरुन त्यांना धान्य मिळेल."


मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी 25 मार्च रोजी 'न्याय'चं आश्वासन दिलं होतं. याअंतर्गत देशातील जवळपास पाच कोटी गरीब कुटुंबांना वार्षिक 72 हजार रुपये देण्याची हमी देण्यात आली होती.


संकटातून शक्तिशाली व्यक्तीच मार्ग काढू शकतो हा समज चुकीचा
दरम्यान 'शक्तिशाली व्यक्ती'च अशा संकटाच्या स्थितीवर मात करु शकतो हा समज चुकीचा असल्याचं अभिजीत बॅनर्जी यांनी सांगितलं. यासाठी त्यांनी अमेरिका आणि ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा दाखला दिला. जगातील महाशक्ती असलेल्या अमेरिकेत कोरोनाने थैमान घातलं आहे. जगभरातील सर्वाधिक मृतांची संख्या अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे.


Coronavirus | लॉकडाऊननंतर चांगल्या उपाय योजनांची गरज; अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जींसोबत राहुल गांधी यांचा संवाद