नवी दिल्ली: खाण्याच्या पावामध्ये कॅन्सरजन्य केमीकल आढळल्यानंतर केंद्र सरकार पोटॅशियम ब्रोमेट या केमिकलवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी काल यासंदर्भात तसे संकेत दिले आहेत.


 

काही दिवसांपूर्वी सीएसई या अन्न नियंत्रक संस्थेनं ब्रेड आणि पावात कँन्सरजन्य केमीकल असल्याचा अहवाल दिला होता. भारतात पाव फुगवण्यासाठी पोटॅशियम ब्रोमेटचा वापर केला जातो. पण इतर देशांमध्ये या केमिकलवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नड्डांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत फुड सेफ्टी अथॉरिटीला या प्रकरणात लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना घेण्याचे आदेश दिले आहेत.

 

दरम्यान, सीएसई या अन्न नियंत्रक संस्थेनं ब्रेडमुळं कॅन्सर होतो. असा अहवाल दिला आहे. त्यावर आसोचम या दुसऱ्या अन्न नियंत्रक संस्थेनं या अहवालावर शंका उपस्थित केली आहे. सीएसईच्या अहवालामुळं ग्राहकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होत असल्याचं मत आसोचमकडून व्यक्त करण्यात येतं आहे. बेकरी उत्पादनामध्ये पोटॅशियम ब्रोमेट हे एफएसएसआयच्या परवानगीनुसारच वापरण्यात येतं असा दावाही आसोचमनं केला आहे. दरम्यान, राज्यातले सर्व ब्रेड आणि बेकरींचे नमुन तपासले जातील. अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.

 

ब्रेड, पाव, बन पाव, पिझ्झा ब्रेड, बर्गर ब्रेड अशा सर्व घटकांमध्ये कॅन्सरजन्य केमिकल असल्याचा दावा सेंटर फॉर सायन्सने केला आहे. त्यासाठी संस्थेने दिल्लीतील विविध बेकरी आणि फास्ट फूड आऊटलेटमधील नमुने तपासले. धक्कादायक म्हणजे त्यापैकी 75 टक्के टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. सीएसईने दिल्लीमध्ये 38 प्रकारचे ब्रेड तपासले, त्यातल्या 84 टक्के ब्रेडमध्ये ब्रोमेट आणि आयोडेट अधिक प्रमाणात होतं.

 

केमिकलमुळे या रोगांना निमंत्रण

 

– या दोन्ही केमिकल्सच्या सेवनाने मूत्रपिंडाचे विकार होऊ शकतात.

– थायरॉईडसारख्या आजाराला आपण निमंत्रण देऊ शकतो.

– इतकंच नाही, तर केमिकलच्या अति सेवनाने कॅन्सरही होऊ शकतो.

 

परदेशात बंदी मात्र भारतात सर्रास वापर

 

अन्न प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी झटणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेने 1989 साली ब्रोमेट हे घातक असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे 1990 पासून कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, श्रीलंका, ब्राझील, नायजेरिया, पेरु, कोलंबिया अशा देशांमध्ये ही दोन्ही केमिकलवर बंदी आहे. पण आपल्या देशात अन्न प्रक्रियेला नियंत्रित करणारा कुचकामी कायदा हा आपल्याच जीवावर उठला आहे.