मुंबई : देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकले आहेत. हाताला काम मिळत नसल्याने जवळ पैसे नसल्याने अनेकांनी पायी, काहींनी सायकलवर तर काहींनी मिळेल त्या साधनाच्या मदतीने घरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र या मजुरांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. या दरम्यान बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने पुढे येऊन अनेक मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनूच्या या कामाची प्रशंसा केली.
सोनू सूद मुंबईसह महाराष्ट्रात अडकलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांतील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूशी संवाद साधला. सोनूनेही त्यांना उत्तर देत मदतीचं आश्वासन दिलं. अशा एका ट्वीटला स्मृती इराणी यांनी रिट्वीट करत रिप्लाय दिला आहे.
स्मृती इराणी यांनी म्हटलं की, "सोनू हे माझं भाग्य आहे की मी एक प्रोफेशनल सहकारी म्हणून तुम्हाला गेल्या दोन दशकांपासून ओळखते. अभिनेता म्हणून तुमची प्रगती पाहून आनंद झाला. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत तुम्ही जी दानशूर वृत्ती दाखवली, त्याबद्दल मला तुमच्यावर जास्त गर्व आहे. गरजूंना मदत केल्याबद्दल तुमचे धन्यवाद."
सोनूने देखील स्मृती इराणी यांच्या ट्वीटला उत्तर देत म्हटलं की, "धन्यवाद, तुम्ही नेहमी प्रेरणादायी आहात. तुमच्या स्तुतीमुळे मेहनत करण्याची आणखी प्रेरणा मिळाली आहे. जोपर्यंत आपले प्रत्येक भाऊ-बहीण सुखरुप घरी पोहोचत नाहीत, तोपर्यंत मी सोबत असेन."
CM Uddhav Thackrey | 31 मे नंतर लॉकडाऊनचं काय होणार? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले