नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस आहे. त्या आज 74 वर्षाच्या झाल्या आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस पक्षाने या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केलाय.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोनिया गांधीना शुभेच्छा देताना एक ट्वीट केलं आहे. मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, "श्रीमती सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईश्वर त्यांना दीर्घायु आणि आरोग्य देवो."





केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सोनिया गांधीना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, "कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईश्वर त्यांना दीर्घायु आणि आरोग्य देवो."





कॉंग्रेस नेते शशी थरुर यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, "देशासमोर असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कॉंगेस नेत्या सोनिया गांधींनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी आजवर अनेक संकटावर मात केलीय. त्या जिद्दीला मी सलाम करतो आणि त्यांना दीर्घायु, बळ आणि आनंद मिळो अशी इच्छा व्यक्त करतो."





कॉंगेसचे नेते सचिन पायलट यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, "आपल्या कुशल नेतृत्वामध्ये देशाला आणि पक्षाला जे काही मार्गदर्शन मिळालं आहे ते प्रेरणादायी आहे. मी आपल्या दीर्घायु आणि चांगल्या आरोग्याची प्रार्थना करतो."





शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही सोनिया गांधीना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, "मी आपल्या चांगल्या आरोग्याची आणि आनंदाची प्रार्थना करते."





राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधींना शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, "सोनियाजी या पक्षासाठी नेहमीच उर्जेच्या स्त्रोत राहिल्या आहेत. त्यांची जिद्द आणि त्याग या गोष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत."





या व्यतिरिक्त मिलिंद देवरा, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांच्यासह अनेक दिग्गजांनी सोनिया गांधींना शुभेच्छा दिल्या आहेत.


सोनिया गांधी यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 साली इटलीमध्ये झाला. कॉंगेस पक्षाची वाताहत झाली असताना, पक्ष विखुरला गेला असताना 1998 साली त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर 2004 साली अनेक पक्षांशी आघाडी करुन सोनिया गांधींनी कॉंग्रेसला सत्तेत आणले. त्या 1998 ते 2017 सालापर्यंत कॉंग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. कॉंग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ अध्यक्षपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आताही राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर सोनिया गांधींकडे कॉंग्रेसचे अंतरिम अध्यक्षपद आहे.


सोनिया गांधींना गेल्या काही काळापासून आजारपणाचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांनी त्यांना दिल्लीच्या वाढत्या प्रदूषणापासून दूर राहण्याचा दिल्याने त्या सध्या गोव्यात आहेत. राहुल गांधीही त्यांच्यासोबत आहेत.