Sonia Gandhi PA PP Madhavan: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे खाजगी सचिव पीपी माधवन यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. पीपी माधवन यांनी नोकरी आणि लग्नाच्या बहाण्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा दावा एका महिलेने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला दिल्लीची रहिवासी आहे. महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.


एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, नोकरीच्या संदर्भात पीपी माधवनसोबत तिची ओळख झाली होती. महिलेने सांगितले की, फेब्रुवारी 2020 मध्ये पतीच्या निधनानंतर ती नोकरीच्या शोधात होती. यादरम्यान ती माधवन यांच्या संपर्कात आली. पीडित महिलेचे सांगितले की, माधवन यांनी तिला मुलाखतीच्या संदर्भात फोन केला होता.


माधवन यांनी पीडितेला नोकरीचे आश्वासन दिले होते. या बहाण्याने ते महिलेशी व्हिडीओ कॉलवर बोलायचे. whatsapp वर चॅट करायचे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, पीपी माधवन यांनी तिला सांगितले की, त्यांचे तिच्यावर प्रेम आहे आणि त्यांना तिच्याशी लग्न करायचे आहे. त्यांनी महिलेला नोकरी लावण्याचे आणि नंतर लग्न करण्याचे म्हणत संमतीशिवाय महिलेचा शारीरिक गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. तसेच महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. 


पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीपी माधवन यांनी तिला या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील सुंदरनगर येथील फ्लॅटमध्ये नेले. तेथे त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. दिल्लीतील उत्तम नगरमध्ये माधवन यांनी कारमध्ये महिलेसोबत अत्याचार केल्याचा आरोपही आहे. वृत्तानुसार, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी माधवनविरुद्ध कलम 376 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध दिल्लीतील उत्तम नगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, माधवन हे सोनिया गांधींचे अत्यंत विश्वासू मानले जातात, असे म्हटले जाते. अनेक वर्षांपासून ते सोनिया यांच्यासोबत काम करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, माधवन आणि गांधी कुटुंबातील जवळीक कौटुंबिक नात्यासारखी आहे. Rediff.com च्या बातमीनुसार, माधवन यांच्या मुलाचे लग्न मार्च 2020 मध्ये झाले होते. यावेळी राहुल आणि प्रियांका गांधी लग्नाला उपस्थित राहण्यासाठी केरळला गेले होते.